प्रतिनिधी / कोल्हापूर
मतदार निर्माण करण्याच्या दृष्टीने विद्यापीठांची भूमिका महत्त्वाची असून त्यांनी अभ्यासक्रम निर्मितीसह विविध उपक्रम राबवावेत, अशी अपेक्षा प्रधान सचिव तथा मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी आज येथे व्यक्त केली. देशपांडे यांनी आज शिवाजी विद्यापीठाला सदिच्छा भेट देऊन गत-बैठकीचा आढावा घेण्यासह निवडणूक प्रक्रियेमध्ये युवकांचा सहभाग वाढविण्याच्या अनुषंगाने कोणते उपक्रम राबविता येतील, या दृष्टीने चाचपणी केली. यावेळी प्र-कुलगुरू डॉ. पी.एस. पाटील, प्रभारी कुलसचिव डॉ. व्ही.एन. शिंदे, कोल्हापूरचे उप-जिल्हा निवडणूक अधिकारी भगवान कांबळे, पन्हाळा उपविभागीय अधिकारी अमित माळी, विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. आर.व्ही. गुरव, राष्ट्रीय सेवा योजना समन्वयक अभय जायभाये आदी उपस्थित होते.
देशपांडे म्हणाले, सर्वसाधारणपणे विद्यार्थी दशेपासूनच निवडणूक प्रक्रियेची माहिती व्हावी, या उद्देशाने विद्यापीठीय व्यवस्थेकडून निवडणूक आयोगाच्या मोठ्या अपेक्षा आहेत. त्या दृष्टीने शिवाजी विद्यापीठाने दोन क्रेडिटचा अभ्यासक्रम आगामी शैक्षणिक वर्षापासून कार्यान्वित होईल, या दृष्टीने प्रयत्न करावेत. हा अभ्यासक्रम मोजका सैद्धांतिक आणि अधिकाधिक कृतीशील उपक्रमांवर भर देणारा असावा, याचीही दक्षता घेण्यात यावी.
त्यासाठी ऑनलाईन व ऑफलाईन अशा संमिश्र साधनस्रोतांचा वापर करावा. समूह कृतीगट स्थापनेतून संवाद वृद्धिंगत करण्यावरही त्याचा भर असावा. हा अभ्यासक्रम तयार झाल्यानंतर केंद्रीय निवडणूक आयोगाच्या माध्यमातून विद्यापीठ अनुदान आयोगाद्वारे देशभरातील विद्यापीठांतही हा अभ्यासक्रम लागू करण्यासाठी राज्य आयोगामार्फत प्रयत्न करण्यात येतील. नजीकच्या कालखंडात राज्य निवडणूक आयोग आणि विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने स्थानिक पातळीवर संयुक्तिक विषयावर परिसंवादाचे आयोजन करण्यात यावे. त्यासाठी आयोग सर्वतोपरी सहकार्य करेल, अशी ग्वाही त्यांनी या प्रसंगी दिली.