इयान चॅपेलचे आवाहन, सचिनने चेन्नईत झळकवलेल्या शतकी खेळीच्या आठवणीला उजाळा
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
कोरोनाविरुद्धचा लढा कसा जिंकता येईल, यावर लक्ष केंद्रित करण्यासाठी अवघ्या जगभरात जनजागृती करण्यासाठी सचिन तेंडुलकरच्या चेन्नई कसोटीतील झुंजार शतकी खेळीचा आदर्श समोर ठेवावा, असे जाहीर आवाहन माजी ऑस्ट्रेलियन कर्णधार इयान चॅपेलनी केले. पाच दिवसांच्या कसोटी सामन्यात ज्या संयमाची गरज असते, त्याच संयमाची कोव्हिड-19 प्रकोपाविरुद्ध लढतानाही गरज आहे, असे चॅपेल म्हणतात.
जागतिक स्तरावरील सर्व नागरिकांसमोर सध्याची परिस्थिती अतिशय आव्हानात्मक स्वरुपाची आहे. खेळाडू, ऍथलिट ज्याप्रमाणे एखाद्या सामन्यासाठी किंवा मालिकेसाठी तयारी करतात, त्यासाठी स्वतःला सुसज्ज ठेवतात, त्याचा प्रत्येकाच्या वैयक्तिक आयुष्यात लाभ होऊ शकतो. सध्याच्या घडीला संयम, करारी वृत्ती आणि किंचीत पुढाकार यांची नितांत गरज आहे. नेमके हेच गुण कसोटी क्रिकेट खेळताना खेळाडूंत असावे लागतात, असे ते पुढे म्हणाले. आपला हा मुद्दा अधोरेखित करण्यासाठी चॅपेल यांनी कसोटी क्रिकेटमधील दोन उदाहरणे दिली. 1998 मध्ये सचिनने ऑस्ट्रेलियाविरुद्ध चेन्नई कसोटीत 155 धावांची झुंजार दीडशतकी खेळी साकारली होती, त्याचा चॅपेलनी सर्वप्रथम उल्लेख केला आणि त्यानंतर सचिनच्या या खेळीसह त्यांनी ऑस्ट्रेलियन फलंदाज इयान रेडपाथच्या अशाच एका झुंजार खेळीचाही संदर्भ दिला.
ती खेळी सचिनचा ‘मास्टरपीस’
‘सचिनच्या चेन्नईतील त्या खेळीला मी मास्टरपीस मानतो. त्या खेळीमुळे भारताने कसोटी जिंकलीच. पण, त्याशिवाय, भारताला मालिकेत आघाडीवर येणे अजिबात शक्य झाले नसते. वॉर्नने रफचा वापर करण्यासाठी राऊंड द विकेट मारा केला तर काय रणनीती असावी, असा प्रश्न सचिनने शास्त्राRना केला होता. शास्त्रींनी त्यावर आक्रमण करण्याचा सल्ला दिला होता’, याचा चॅपेल यांनी येथे उल्लेख केला.
याबद्दल तपशीलवार बोलताना ते म्हणाले, ‘त्या लढतीत चौथ्या दिवसाच्या खेळात भारतीय संघ प्रचंड अडचणीत होता. वॉर्नने सचिनला पहिल्या डावात अतिशय स्वस्तात बाद केले होते आणि दुसऱया डावात 2 बाद 44 अशी कठीण स्थिती असताना सचिन फलंदाजीला उतरला. वॉर्नचे चेंडू तेथे चक्क हातभर वळत होते आणि पहिल्या डावात 4 बळींची बेगमी केली असल्याने त्याचे मनोबल आणखी उंचावलेले होते. वास्तविक, त्या परिस्थितीत दोन्ही संघांना विजयाची समसमान संधी होती. पण, सचिनची करारी वृत्ती आणि लढवय्या प्रवृत्ती त्यात निर्णायक ठरले. शास्त्रींच्या सल्ल्याला अनुसरुन सचिनने वॉर्नचे फूटमार्कवर पडलेल्या प्रत्येक चेंडूवर तडाखेबंद फटक्यांचे जोरदार आसूड ओढले आणि याचमुळे सचिनने ते युद्ध जिंकून दिले. कोव्हिडविरुद्ध लढताना अशाच लढवय्या बाणा आणि करारी वृत्तीची गरज आहे’.
1976 मध्ये विंडीजविरुद्ध रेडपथाच्या खेळीचाही चॅपेलनी येथे विशेष उल्लेख केला. सचिनने दाखविलेल्या वृत्तीसह संयमित धाडसाचा समावेश रेडपाथच्या खेळीत होता. सचिनने चेन्नईत जी करारी वृत्ती दाखवली, तीच करारी वृत्ती कोव्हिडविरुद्धही दाखवूया आणि हे युद्ध शक्य तितक्या लवकर जिंकूया, असे आवाहन त्यांनी शेवटी केले.









