नवी दिल्ली : बॅट निर्माती कंपनी स्पार्तनने क्षमायाचना केल्यानंतर सचिन तेंडुलकरने ऑस्ट्रेलियन फेडरल कोर्टमध्ये दाखल केलेली याचिका मागे घेण्याचा निर्णय घेतला. स्पार्तनने करारातील अटीनुसार मानधन व जाहिरात शुल्क अदा न केल्याबद्दल सचिनने या कंपनीविरोधात न्यायालयात धाव घेतली होती. सचिन व स्पार्तन यांच्यात 2016 मध्ये करार झाला होता.
स्पार्तनने करारात ठरल्याप्रमाणे देय रक्कम अदा केली नाही, असे सचिनने आपल्या तक्रारीत म्हटले होते. स्पार्तन कंपनीने याबाबत सचिनकडे दिलगिरी व्यक्त केली आणि त्यानंतर या प्रकरणावर पडदा पडला.
‘करारात निश्चित कालावधीप्रमाणे आम्ही आवश्यक कार्यवाही करु शकलो नाही, याची आम्हाला खंत आहे. सचिन तेंडुलकरने या कालावधीत न्यायालयाबाहेर तडजोड करण्याची तयारी व संयम दाखवला, याबद्दल आम्ही त्यांचे आभारी आहोत’, असे स्पार्तनचे सीओओ लेस गॅल्ब्रेथ यांनी संयुक्त पत्रकातून नमूद केले.
आश्चर्य म्हणजे सचिनशी करार रद्द केल्यानंतर देखील स्पार्तन कंपनीने जाहिरातीत सचिनचे नाव व छायाचित्र वापरणे सुरुच ठेवले होते. सचिनने या कंपनीच्या मुंबई व लंडनमधील काही जाहिरात उपक्रमात सहभाग घेतला होता.









