अध्याय अकरावा
स्वतःच स्वतःची पूजा करणे या अकराव्या पूजास्थानाबद्दल बोलताना भगवंत म्हणाले, सर्व भूतांच्या ठिकाणी माझी पूजा करावयाची असेल तर ती माझ्याशी तादात्म्य झाल्यानेच खरोखर होते. ही अकरावी पूजा माझ्याशी एकरूप होण्यानेच साध्य होते. ही अकराही पूजास्थाने माझी प्राप्ती करून देणारी व अत्यंत पवित्र अशी आहेत. मी तुला सांगितलेल्या वर्णनाच्या अनुरोधाने त्यांची यथाविधि पूजा करावी. मी ज्या पद्धतीने पूजा करावयास सांगितली, त्याच रीतीने पूजा करीत जावी. जर ती रीति नीट कळली नाही, तर त्या अकराही पूजास्थानांच्या ठिकाणी माझ्याच मूर्तीचे चिंतन करावे. ती मूर्ती दिसायला कशी असावी याबद्दलही नाथमहाराज आपल्याला पुढे सांगणार आहेतच. पुढे भगवंत म्हणाले आता सगुण आणि निर्गुण याविषयी सांगतो. निर्गुणापेक्षा सगुण हे कमी योग्यतेचे आहे असे जो म्हणेल, तो निखालस मूर्ख होय असे समज. कारण सगुण व निर्गुण ही दोन्ही सारखीच आहेत. त्यात एक कमी व एक अधिक असे मुळीच नाही. तूप पातळ असले तरी ते तूपच होय पण जर ते थिजले तर त्या पातळ तुपापेक्षा अधिक गोड होते. त्याप्रमाणेच पहा, निर्गुणापेक्षाही सगुण स्वरूपानेच मनाला त्वरित आनंद होतो.निर्गुणाचा बोध होणेच मुळी कठीण असते. कारण ते मन, बुद्धी व वाणी यांना अगम्य असते. शास्त्रांनासुद्धा त्याचे रहस्य कळत नाही. वेदांनीही त्याबद्दल मौनच धारण केले आहे. सगुण मूर्ती सुलभ आणि सुस्वरूप असल्यामुळे तिला पाहताच तहान आणि भूक नाहीशी होते आणि प्रेमाने मन शांत होऊन जाते. नित्यसिद्ध, सच्चिदानंद, प्रकृतीहून भिन्न व परमानंदस्वरूप, स्वानंदाचा मूळकंद असा गोविंद आपल्याच लीलेने सगुण होतो. साखरेची गोडी सर्वत्र वाखाणली जाते पण त्यातही जर खडीसाखरेची ढेप बनविली, तर तिच्या गोडीला जास्त चव येते. त्याप्रमाणेच साकार मूर्तीचा प्रकार आहे. कसोटीला लावून उत्तम ठरलेल्या सोन्याची लगडच्या लगडच घेऊन ती जर नव्या नवरीच्या गळय़ात बांधली, तर ती नवरी सुंदर दिसेल काय? पण त्याच सोन्याचे दागिने करून जर मस्तक, कंबर, हात इत्यादि निरनिराळय़ा अवयवांवर घातले, तर तीच नवरी त्यामुळे अत्यंत शोभून दिसते आणि लोक तिच्यावरून निंबलोण उतरतात. त्याप्रमाणेच जे निर्गुण व निर्विकार असते, त्याचीच आपल्या आवडीप्रमाणे सुकुमार, ज्ञानस्वरूप, अत्यंत सुंदर व मनोहर अशी सगुण मूर्ति होते. नाथ महाराज श्रीकृष्णाच्या मोहक मूर्तीचे अत्यंत बहारदार वर्णन करतात ते वाचून श्रीकृष्णाची स्वरूपसुंदर मूर्ती डोळय़ापुढे उभी राहते ते सांगतात, देदीप्यमान असा श्यामवर्ण, मुकुट, कुंडले व मेखला यांनी विराजमान गळय़ात कौस्तुभमणि व वनमाला आणि भरजरीचा झळकत असणारा पीतांबर! आधीच तो पूर्ण श्यामवर्णी, त्यात आणखी कपाळावर लावलेला पिवळा टिळा दोन्ही नेत्रांमध्ये कमळाच्या पाकळय़ांसही लाजविणारी आरक्त झाक! ज्ञानाचे देखणेपण त्या मूर्तीच्या डोळय़ांना जणू काय शरण आलेले असते! सैरावैरा भटकताना वारा थकला आणि त्याने श्रीहरीच्या नाकात श्वासोच्छ्वास रूपाने जणू काय ठाण मांडले! ओंकारामध्ये जशा श्रुती असाव्यात, त्याप्रमाणे मुखामध्ये दंतपंक्ती शोभतात आणि त्यातील चारही कोपऱयांवरचे चार सुळे दात तर सोलीव सच्चित्प्रकाशाप्रमाणे झळकतात.ज्याप्रमाणे जीव व शिव भिन्नपणाने एकत्र असावेत, त्याप्रमाणे खालचा व वरचा असे दोन्ही ओठ श्रीहरीच्या अंगामध्ये सारखेपणाने व सारख्याच गुणांनी जुळून राहिले. कृष्णाचे मुख पाहून, कृष्णपक्षामध्ये चंद्र क्षीण होऊ लागतो. तो फक्त पौर्णिमेलाच काय तो परिपूर्ण असतो. पण हा कृष्णाचा मुखचंद्र सदासर्वकाळ परिपूर्णच असतो. चंद्राचे तेज दिवसा क्षीण होते, पण ह्या मुखचंदाची शोभा काही अप्रतिमच आहे. त्याच्यामुळे चंद्रसूर्याचे तेजही फिके पडते पण हरीचे मुख सदासर्वदा स्वयंप्रकाशित असते. सगुणस्वरूपामध्ये तो नारायण आर्तरूपी चकोरांना अमृतपान, मुमुक्षुरूपी चातकांना स्वानंदघन आणि सर्व भूषणांना भूषण होऊन राहिला आहे.
क्रमशः







