ऑनलाइन टीम / मुंबई :
देशात लोकशाही आहे त्याला आम्ही मानतो. हे राज्य छत्रपती शिवाजी महाराजांना मानणारे राज्य आहे. त्यामुळे राज्यात त्यांचा सन्मान व्हायला हवा, असे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आज सांगितले. तसेच तंगडय़ा तोडण्याची भाषा करू नका. तंगडय़ा प्रत्येकालाच आहे, अशा शब्दांत त्यांनी माजी खासदार उदयनराजे भोसले यांना अप्रत्यक्षपणे इशारा दिला.
उदयनराजेंनी शिवसेनेवर केलेल्या टीकेनंतर संजय राऊत यांनी उदयनराजेंनी छत्रपतींचे वंशज असल्याचे पुरावे आणावेत, असे विधान केले होते. त्यावरून निर्माण झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी गुरुवारी सकाळी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.
ते म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांना मानणारे हे राज्य आहे. शिवसेनेने छत्रपती शिवाजी महाराजांबाबत कायम नतमस्तक होण्याचे काम केले. ही महाराष्ट्राची ओळख आहे. सगळी महाराष्ट्रीयन जनता शिवाजी महाराजांची वंशज आहे. त्यामुळे आम्हाला इतर कोणी ज्ञान देण्याची गरज नाही. महाराष्ट्रात शिवाजी महाराजांची कोल्हापूर, सातारा ज्या गाद्या आहेत त्याविषयी आमचा कायम आदर. त्याचा आदर ठेवणे आमचे आणि सर्वांचे काम आहे.









