बाजारात लस आली आणि ज्ये÷ नागरिक असल्यामुळे आम्ही उभयतांनी ती घेतली. नंतर निमज्ये÷ नागरिकांना लसीकरण सुरू झाले. आमच्याकडे पोळय़ा आणि स्वयंपाकाला येणारी सखूबाई आणि धुणीभांडी वगैरेला येणारी ठकूबाई या दोघींनी एके दिवशी सुप्रभाती डिक्लेर केलं की “भाऊ, उद्या आम्ही दोघी लस घ्यायला जातो.’’
मी म्हटलं, “जा की. तुमचं लसीकरण झालं की तुम्हाला कोरोनापासून कवचकुंडलं प्राप्त होतील. मग तुम्हाला रोज घरात घेताना क्षणभर भीतीने आमच्या काळजाचा प्रत्येकी एकेक ठोका चुकतो तो चुकणार नाही.’’ तशी त्या म्हणाल्या, “ते तर पुढचं झालं. आमचं महत्त्वाचं पॉइंट ऐकून घ्या आता.’’
“बोला, बोला.’’
“आम्ही दोघी उद्या सकाळी आठ वाजता लसीकरण केंद्रावर जाणार आहोत. तिथं किती वेळ लागेल ते सांगता येत नाही. लस घेतल्यावर आम्ही तिथं अर्धा तास थांबलो की थेट आपापल्या घरी जाऊ. नंतर आम्हाला बारीक कणकण, अंगदुखीसारखे त्रास होण्याची शक्मयता आहे. अशा वेळी एखादी गोळी घेऊन आम्ही विश्रांती घेतली की परवा आम्हाला सुट्टी घ्यावी लागेल.’’
“थोडक्मयात काय, तुम्ही दोघी दोन दिवस येणार नाही, आम्हाला दोघांना दोन दिवस जादा घरकाम पडणार, समजलं. ठीक आहे.’’
तेवढय़ात आतून बायको आली आणि म्हणते कशी, “सुट्टी घेताय तर घ्या. पण उद्या लसीकरण केंद्रावर तरी वेळेवर आठ वाजता जा. आपल्याकडे नेहमी आठ वाजताची वेळ देवून सबबी सांगून उशिरा येता, तसं नका करू.’’ (लेडीजच्या बाबतीत मी जरा ‘मृदूनि कुसुमादपि’ असलो तरी बायको आहे हे वाचकांनी ताडले असेलच.) मग दुसऱया दिवशी आम्ही स्वतः स्वयंपाकाला सिद्ध झालो. वरण-भाताचा कुकर लावला. भाजी केली. बायको पोळय़ा करायला घेणार, एवढय़ात बेल वाजली. हल्ली कोणी कोणाकडे येत नाही. त्यामुळे कोण असावं असा विचार करीत दार उघडलं. बाहेर पोळय़ावाली सखूबाई होती. डोळे रडून लाल झालेले.
“काय झालं?’’
दोघी रांगेत उभ्या राहिल्या होत्या. पण त्यांचा नंबर येईतो लस संपली. दवाखान्याजवळ शिवभोजन केंद्र होतं. दोघी तिथं जेवल्या. जेवताना ठकूबाईने तिला टोमणा मारला, “इथल्या पोळय़ा तुझ्या हातच्या पोळय़ांपेक्षा मऊ आणि सुंदर आहेत.’’
आम्ही सखूबाईची समजूत काढली. मग आम्ही जेवायला बसलो. तिने गरमागरम पोळय़ा करून वाढल्या.








