“क्षितिज”चे धाडसी पाऊल; संगीत मत्स्यगंधा चा कुडाळ येथे शुभारंभ
प्रतिनिधि/कुडाळ-
सकाळच्या सत्रात नाट्यप्रयोग ही जिल्ह्याच्या सांस्कृतिक क्षेत्रातील नवी पहाट असल्याचे प्रतिपादन जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी यांनी क्षितिज इव्हेंट या संस्थेच्या कुडाळ येथील संगीत मत्स्यगंधा या शुभारंभाच्या नाट्यप्रयोग वेळी बोलताना केले. क्षितिज चे हे धाडसी पाऊल असून यापुढे सांस्कृतिक क्षेत्र बरोबरच जिल्ह्यातील प्रत्येक क्षेत्राला जिल्हा बँक पाठबळ देणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली.
स्वर्गीय दिनकर धारणकर स्मृतींप्रित्यार्थ सावंतवाडी येथील क्षितिज इव्हेंट या संस्थेने संगीत मत्स्यगंधा नाटक रंगमंचावर आणले आहे. बाळ पुराणिक यांनी याचे दिग्दर्शन केले असून शुभारंभाचा नाट्यप्रयोग कुडाळ येथील मराठा समाज हॉल येथे सादर करण्यात आला. विशेष म्हणजे हा प्रयोग सकाळी ९.३० वाजता सादर करण्यात आला. नाट्य रसिकांचा ही चांगला प्रतिसाद लाभला.
सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून या नाट्य प्रयोगाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी बोलताना मनीष दळवी यांनी सकाळच्या सत्रातील नाट्यप्रयोग ही संकल्पना सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी नवीन आहे. वेळ आणि काळ याबरोबर बदल हा अपेक्षित आहे. त्याअनुषंगाने क्षितिज ने धाडसी पाऊल उचलले आहे. या क्षणाचा साक्षीदार होण्याचा मान मिळाला ही आपल्यासाठी अभिमानास्पद बाब आहे.









