सध्या कोरोना आकडेवारी लपविली जात असल्याची चर्चा झाली आणि आरोग्य विभागाकडून देण्यात आलेल्या स्पष्टीकरणाने ती संपलीही.मुद्दा आकडेवारी लपविली या आरोपाचा नसून त्या निमित्ताने होणाऱया विलंबाची तांत्रिक कारणे सर्वांसमोर आली. तशी कारणे असल्यास त्यात सुधारणा करणे आरोग्य यंत्रणेला अपरिहार्य आहे.
आजारांच्या लसीकरणात कोरोना हा पहिला आजार असा आहे की ज्याच्या लसीकरणाची नोंद ऍपवरून होत आहे. कोरोना काळात लसीकरणाचीच नोंद ऍपवरून होत आहे असे नसून कोरोनाबाधितांच्या आणि मृत्यूच्या नोंदीदेखील रुग्णालयांना देण्यात आलेल्या ऍपवरून होत आहेत. पुढे या नोंदी राज्य कोरोना पोर्टलवर अद्ययावत करण्यात येतात. म्हणजे कोरोनाच्या लसीकरणापासून ते बाधित मृत्यूपर्यंतच्या नोंदीही ऍपच्या माध्यमातून होत आहेत. ऍप म्हटले की तांत्रिक अडचणी आल्या. तशा अडचणींना सामोरे जात कोरोनाच्या नोंदी होत आहेत. कोरोनाबाबत सर्वसामान्यांपासून आरोग्य यंत्रणेतील प्रत्येक घटक संवेदनशील असल्याने त्याची खातरजमा करूनच नोंदी आणि निदान केले जात आहे. यात उशीर होत असल्याचे टप्प्याटप्प्यावर समजून येते. ऍपच्या अडचणीसह आरोग्य यंत्रणेत काम करणाऱया व्यक्तीं कोरोनाबाधित होणे, बदल्या होणे, कामाचे स्वरूप बदलणे, ते तसे बदलल्यास त्याचे नवीन कामाचे प्रशिक्षण घेणे या सर्व बाबी देखील अडथळ्याच्या ठरल्या आहेत. शिवाय गेले वर्षभर कोरोना आकडेवारीत पारदर्शकता येण्यासाठी तज्ञांच्या आणि अधिकाऱयांच्या व्हीडिओ कॉन्फरन्सिंग बैठका, नियोजनाबाबतच्या बैठका, दिवसाअखेर अहवाल ताळमेळाच्या बैठका तरीही काही चुकल्यास पडताळणीच्या सूचना यातच यंत्रणा मेटाकुटीस आली असल्याचे अधिकारी सांगतात. कोरोना नोंदीत लपवाछपवी होत असल्याचा आरोप असला तरी माहिती अद्ययावत करण्याकडे यंत्रणेचा अधिक कल असल्याचे स्पष्ट दिसते. 10 जूनपासून एक आठवडय़ापेक्षा अधिक कालावधीपूर्वी जिल्हे आणि मनपा क्षेत्रातील मृत्यूची आकडेवारी पाहिल्यास हजारांची संख्या गाठलेली दिसून येते. 10 जून रोजी मृत्यूची संख्या 1522 ने वाढली होती तर 11 जून रोजी तब्बल 2213 ने वाढली असल्याची नोंद आहे. तर 12 जून रोजी अद्ययावत केलेली मृत्यूची संख्या 1606 ने वाढली असून 13 जून रोजी ती 2288 ने वाढली असल्याची नोंद करण्यात आली. हे आकडेवारी काही कारणास्तव उशिराने नोंद झाली. मृत्यू नोंदीत विलंब झाला असला तरी नोंदीत पारदर्शकता ठेवल्याचे समाधान आरोग्य विभाग मानत आहे. मात्र हजारो मृत्यू विलंबाने नोंद केले गेल्याने तोपर्यंत ते कोव्हिड मृत्यू नव्हते का अशासारखे शंकेचे प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत. जर हे मृत्यू तोपर्यंत कोव्हिड ठरले नसले तर आगामी नियोजनातदेखील त्या मृत्यूना नॉन कोव्हिड म्हणूनच वागणूक मिळाली का? कोविड मृत्यू नोंद वेळच्या वेळी झाल्यास महामारी नियोजनात सुस्पष्टता येऊ शकते. अन्यथा महामारीच्या प्रोटोकॉलमधील गंभीर परिणामांना सामोरे जावे लागेल अशी शक्यता वर्तविण्यात येते.
दरम्यान मृत्यू लपविले जात नसल्याचे उदाहरण सांगताना आरोग्य विभाग उत्तर प्रदेश, गुजरात, ओडिशासारख्या राज्यातील मृत्यू नोंद महाराष्ट्रातील मृत्यूनोंदीशी करताना दिसते. बिहार राज्यातील मृत्यू हे ठाणे जिह्यातील मृत्यूएवढे आहेत. तसेच उत्तर प्रदेशची लोकसंख्या महाराष्ट्राच्या दुप्पट असूनदेखील या राज्यात 21,597 मृत्यू झाले असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र ही आकडेवारी मुंबई -ठाणे शहरातील मृत्यूपेक्षा कमी आहे. तर 7 कोटी लोकसंख्या असलेल्या गुजरात राज्यात पुण्यापेक्षाही कमी मृत्यूची नोंद आहे. तर एकटय़ा अहमदनगर जिह्यातील मृत्यू हे ओडिशापेक्षा कमी आहेत. तर नाशिकमध्ये झालेले मृत्यू आसाम आणि तेलंगणापेक्षा अधिक आहेत. मध्य प्रदेशात एकूण कोरोना मृत्यू हे नागपूर आणि चंद्रपूरपेक्षा कमी असल्याची नोंद आहे. ही तुलनात्मक आकडेवारी राज्यातील कोरोना आकडेवारी समोर अत्यंत कमी असून त्यामुळेच लपविण्याचा प्रश्न येत नसल्याचे आरोग्य विभागाचे म्हणणे आहे.
सध्या आरोग्य यंत्रणेला कोव्हिड प्रोटोकॉल पाळण्याच्या सूचना आहेत. त्यामुळे आरोग्य यंत्रणा रुग्णालये उपचार, ऑक्सिजन, बेड व्यवस्थापन ते रुग्णावर उपचार करणे यात अधिक गुंतलेली आहे. असे करत असताना आरोग्य यंत्रणेतील अनेकजण बाधित झाले. प्रत्यक्ष रुग्णालयात काम करणाऱया मनुष्यबळाव्यतिरिक्त लॅबमध्ये काम करणारे, 24 तास माहिती पुरवणारे, ग्रामीण शहरी भागात तळागाळात कोव्हिडची माहिती घेणारे अशा हजारो व्यक्तीकडून माहिती मिळविण्यात येत आहे. त्यांना माहिती पुरविताना बऱयाच अडचणी येत आहेत. रुग्णाचा रॅपिड ऍंटीजन टेस्ट अहवाल बाहेर आल्यापासून त्याला भरती करणे, त्याची आरोग्य पोर्टलवर माहिती भरणे, बाधितांची वर्गवारी (सौम्य की अन्य संसर्ग) तपासणे यासारख्या सर्व माहितीचा ताळमेळ राखावा लागत आहे.
हे केल्यावर ही माहिती पोर्टल किंवा ऍप अगदी सुरळीतपणे चालत असल्यास ती नोंद त्याच दिवशी होऊ शकते. तसेच लॅबकडून येणारी माहिती राज्याच्या कोव्हिड पोर्टलवर सिंक्रोनाईझ कालावधी जात असतो. त्या कालावधीनंतरच ते पोर्टल संपूर्ण अद्ययावत होत असते. स्थानिक आरोग्य केंद्र, पालिका आणि जिल्हा स्तरावर तपासून राज्याच्या पातळीवर कोव्हिड माहितीची नोंद करण्यात येत आहे. मृत्यूदेखील कितीही जुने असले तरी त्यांची माहिती घेऊन ते पोर्टलवर अपडेट करतो आहोत. त्यामुळेच मागच्या 15 दिवसात 8 हजाराहून अधिक मृत्यूंचा समावेश करण्यात आला. आरोग्य यंत्रणा मृत्यू लपवत नाही मात्र तांत्रिक कारणातून नोंदीला उशीर होत असल्याची कबुली आरोग्य विभागाने यापूर्वीच दिली आहे.
कोव्हिड माहिती लपविली जात नसून उशीर होत असल्याची बाब आरोग्य विभागाने सांगितली असली तरीही कोरोनासारख्या आतापर्यंत ज्ञात नसलेल्या आजाराला सामोरे जाताना आरोग्य यंत्रणेने सजग राहणे आवश्यक आहे.
राम खांदारे








