लॉकडाऊनच्या काळात लोकांनी घरातूनच कचेरीची कामे केली आणि रोजगार टिकवले. पण घरातच कोंडून राहिल्याच्या भावनेने अनेकांना अंशतः तरी नैराश्य आलं. चिडचिड झाली. काही कुटुंबात घरगुती हिंसाचार घडला किंवा वाढला. भांडणं वाढली. अस्वस्थता वाढली. या काळात करमणुकीची साधनंदेखील संकोचली होती. अशावेळी सेवाभावी माणसं ओळखीच्या-अनोळखी लोकांना फोनवरून, मेसेजेसमधून धीर देत होती. समुपदेशन करीत होती. या काळातच आंतरजालावर एक संकल्पना आढळली. सकारात्मक जगायचं म्हणजे नेमकं काय करायचं यावर जपानी लोकांनी केलेला हा विचार आहे. संकल्पनेचं नाव आहे इकीगाई. ढोबळपणे सांगायचं तर इकी म्हणजे जगणं आणि काई म्हणजे त्याला अर्थ देणं. आठव्या शतकाच्या अखेरीपासून ही संकल्पना आहे.
जपानच्या दक्षिणेला ओकिनावा बेटावरील लोकसंख्येचं वैशिष्टय़ म्हणजे इथले जवळपास सर्वजण शतायुषीच नव्हे तर शतक पार केलेले वीर आणि वीरांगना आहेत. इथलं हवामान आरोग्यदायी आहे, लोकांचे आहार शास्त्रशुद्ध आहेत आणि तणावरहित आयुष्य जगण्याची कला त्यांनी आत्मसात केली आहे. यांची जीवनशैली इकीगाई पद्धतीची आहे. हेक्टर गार्शिया नावाच्या लेखकाने या जीवनशैलीवर अनेक पुस्तके लिहिली आहेत. त्याची काही निरीक्षणे आणि अवतरणे वाचली तर या जीवनशैलीची साधारण कल्पना येईल. स्वतः हा लेखक सकाळी उठल्यावर ग्रीन टी घेतो, नंतर पंधरा मिनिटे योगासने करतो. नंतर तासभर त्याच्या आवडीचं काम म्हणजे लेखन करतो. दिवस असा मनाप्रमाणे सुरू झाला की उरलेला दिवस चांगला जातो. त्याची काही सूचनावजा अवतरणे. तोच तोचपणामुळे तुम्ही कंटाळला असाल तर आयुष्यात काही बदल घडवण्याचा प्रयत्न करा. नवा छंद, नवे मित्र किंवा नवीन नोकरी मिळवण्याचा प्रयत्न करा. भूतकाळ विसरा. भविष्य अजून आलेले नाही. वर्तमानकाळात जगायचा प्रयत्न करा. इतरांशी संपर्क ठेवण्यातून किंवा एखादा खेळ खेळण्यातूनदेखील जगण्याला प्रेरणा मिळते, एकटेपणातून आलेले नैराश्य जाते. ज्याला जगण्यासाठी कारण सापडले आहे, त्याला जगायचे कसे हा प्रश्न पडत नाही. मेंदूला नवे खाद्य पुरवले की तो ताजातवाना होतो. विचार चांगले आहेत. निम्म्या समाजाला उपयुक्त ठरतील. पण ज्यांचा अन्न, वस्त्र आणि निवाऱयाचा मूलभूत प्रश्न सुटलेला नसेल त्यांच्यासाठी इकीगाई काय करील? एकाच शतकापूर्वी जपान पाश्चात्यांच्या गुलामीत होता. तेव्हा इकीगाईने त्याला काय मदत केली? भौतिक प्रश्न भौतिक मार्गाने सोडवण्याला पर्याय नाही.








