कोपा अमेरिकन चषकावर अर्जेंटिनाने नाव कोरल्यानंतर प्रति÷sच्या युरो चषक फुटबॉल स्पर्धेचे इटलीने पटकावलेले विजेतेपद नि सर्बियाच्या नोव्हाक जोकोविचचे विम्बल्डन टेनिस स्पर्धा जिंकत नोंदवलेली ऐतिहासिक हॅटट्रिक यासह आठवडय़ाभरातील क्रीडा क्षेत्रामधील विविध घटना म्हणजे सद्याच्या वातावरणातील आनंदाची झुळूकच म्हणायला हवी. फुटबॉल जगतात युरो चषक स्पर्धेस विशेष महत्त्व आहे. यंदाही अनेक उत्कंठावर्धक लढतींनी ही स्पर्धा सजली. स्पर्धेचा अंतिम सामनाही रोमहर्षक होणे, हा तर कळसाध्यायच ठरावा. तसे इटली व इंग्लंड तोडीस तोड संघ. किंबहुना, इंग्लंडहून सरस खेळ नोंदवित इटलीने सर्वार्थाने आपणच विजयाचे हक्कदार असल्याचे दाखवून दिले. यापूर्वी 1968 मध्ये इटलीने युरो चषक जिंकला होता. त्यानंतर 53 वर्षांनंतर हा संघ या कामगिरीची पुनरावृत्ती करतो, यातूनच या विजेतेपदाचे मोल लक्षात येते. इटलीने 1934, 1938, 1982, 2004 अशी चार वेळा विश्व चषक स्पर्धा जिंकली आहे. हा जगज्जेता संघ सलग 34 सामने अपराजित आहे. त्यांची ही कामगिरी अजोडच. खरे तर या संघात कुणी एक असा स्टार नव्हता. सांघिक यशच त्यांना येथवर घेऊन आले, हे ध्यानात घेतले पाहिजे. या देशालाही मागच्या दीड वर्षात कोरोनाशी निकराने सामना करावा लागला. या काळातील कटू आठवणींना बाजूला सारत देशवासियांनी आनंद साजरा करणे, हे चित्र सुखावणारे होय. इंग्लंडला 55 वर्षांनंतर आंतरराष्ट्रीय जेतेपदाची संधी होती. मात्र, त्यांनी ती दवडल्याने देशवासियांची प्रतीक्षा कायम असेल. दुसरीकडे इंग्लंडच्या तीन खेळाडूंविरुद्ध त्यांच्याच देशातील काही चाहत्यांनी वर्णद्वेषी टिप्पणी करणे, हे काही खिलाडूवृत्तीचे चिन्ह नाही. इटली व इंग्लंडच्या चाहत्यांमधील हाणामारीही याच सदरात मोडणारी. प्रत्येक खेळात हार व जीत ही असतेच. एक संघ जेता तर दुसरा उपविजेता ठरणार हे नक्की असते. स्वाभाविकच खेळाचा आनंद लुटणे हे अधिक महत्त्वाचे. ती जबाबदारी प्रत्येक क्रीडारसिकाने पार पाडायला हवी. दुसरीकडे सर्बियाच्या अग्रमानांकित नोव्हाक जोकोविचने आपला विजेतेपदाचा सिलसिला कायम ठेवत प्राप्त केलेले 20 वे गॅण्डस्लॅम जेतेपद हा मैलाचा दगड ठरावा. या माध्यमातून त्याने रॉजर फेडरर व राफेल नदाल या महान खेळाडूंच्या विक्रमाशी बरोबरी साधत अपेक्षा उंचावल्या आहेत. मागची दीडेक दशके टेनिसवर प्रामुख्याने या तीन खेळाडूंचे वर्चस्व राहिले आहे. तसा आकडेवारीत जोकोविच मागे होता. परंतु, अलीकडे सर्वोत्तम फॉर्ममध्ये असणारा हा विक्रमवीर यशाच्या एकेक पायऱया चढताना दिसतो. त्याची कामगिरी पाहता तो नदाल व फेडररला मागे टाकून विक्रमाच्या नव्या सिंहासनावर आरूढ होईल, ही आस बळावते. यंदाच्या मोसमात प्रेंच, विम्बल्डन, ऑस्ट्रेलियन ओपन जिंकणाऱया जोकोविचला आता ऑलिंपिक व अमेरिकन ओपन जिंकून ‘गोल्डन ग्रॅण्डस्लॅम’चा मानकरी होण्याची सुवर्णसंधी आहे. टोकियो ऑलिंपिकमध्ये सहभाग घेण्याबाबत त्याच्या मनात काहीशी द्विधा आहे. हे बघता हा पराक्रम त्याच्या हातून घडणार का, हे पाहणे औत्सुक्मयाचे असेल. या आधी महिला टेनिसमधील स्टार खेळाडू स्टेफी ग्राफ हिने असा गोल्डन इतिहास नोंदविला आहे. आता जोकोविचवर आशा असतील. जेतेपदानंतर जोकोविचने व्यक्त केलेली प्रतिक्रिया तो टेनिस किती गंभीरपणे खेळतो, याचे द्योतक होय. फेडरर, नदालशी बरोबरी साधल्याने आपण स्वतःला भाग्यवान समजतो. गोल्डन ग्रॅण्डस्लॅमसाठी आपण सर्वस्व पणाला लावू, हा त्याचा निर्धार पुरेसा बोलका आहे. युवा टेनिसपटू माटेओ बेरेट्टीनी याची कामगिरीही आश्वासक. मात्र, महत्त्वाच्या सामन्यात युवा टेनिसपटू अनुभवात कमी पडत असल्याचे सातत्याने दिसून येत आहे. त्यामुळे केवळ जोश पुरेसा नसतो, तर क्लास व टायमिंग महत्त्वाचे असते, हे या खेळाडूंनी लक्षात घ्यावे. महिला टेनिस स्पर्धेत ऍश्ले बार्टी हिने विम्बल्डन सम्राज्ञी हा किताब मिळविला आहे. 2019 च्या प्रेंच स्पर्धेनंतरचे तिचे हे यशही तितकेच खास म्हणता येईल. क्रीडा जगतात असे एकेक विक्रम सजले जात असताना भारतीय महिला क्रिकेट संघातील अष्टपैलू हरलीन देओलने इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात हवेत सूर घेत टिपलेल्या अफलातून झेलची सर्वत्र अजूनही चर्चा आहे. ज्या चपळाईने व कौशल्याने सीमारेषेबाहेरून आत येत सूर मारून हा झेल तिने घेतला, ते सारे अविश्वसनीय म्हणावे लागेल. खेळात फलंदाजी आणि गोलंदाजी यावर सर्वाधिक फोकस राहतो. किंबहुना सामना फिरविण्यासाठी झेल वा क्षेत्ररक्षण आवश्यक ठरते. अलीकडचे महिला क्रिकेटमधील सामने पाहिले, तर त्यातही क्षेत्ररक्षणावर विशेष भर दिला जात असल्याचे पहायला मिळते. जाँटी ऱहोड्स, अझर, युवराज, रिकी पाँटिंग हे उत्तम क्षेत्ररक्षणासाठी ओळखले जात. त्यांनी सूर मारून घेतलेले झेल त्यांच्या खेळीसारखेच अजरामर झाले. हरलीनचा झेलही असाच संस्मरणीय. क्रीडा क्षेत्रातील या वैशिष्टय़पूर्ण आठवडय़ानंतर आता सर्वांना वेध लागले असतील, ते ऑलिंपिक स्पर्धेचे. यंदा जपानची राजधानी टोकियो येथे ही स्पर्धा होत आहे. या स्पर्धेवर यंदा कोरोनाचे सावट आहे. त्यामुळे सर्वांसाठीच ही स्पर्धा आव्हानात्मक असेल. भारताची मदार कुस्ती, नेमबाजी, बॅडमिंटन, बॉक्सिंग, तिरंदाजी अशा काही खेळांवर राहील. यात कोणतेही दडपण न घेता 100 टक्के योगदान देण्याचा प्रयत्न खेळाडूंनी करावा. जेणेकरून ही स्पर्धाही स्मरणीय ठरेल. मानवी जीवनात खेळाला असाधारण महत्त्व आहे. तुम्ही खेळात करियर करा वा अन्य क्षेत्रात. खेळकरपणा असेल, तर व्यक्तिमत्त्वाचा विकास चौफेर पद्धतीने होऊ शकतो. भविष्यात भारतासारख्या देशात स्पोर्ट्स कल्चर कसे निर्माण करता येईल, यादृष्टीने आपण पाहिले पाहिजे. त्याचबरोबर खेडय़ापाडय़ातील टॅलेंट शोधून या मुलांना योग्य ते प्रशिक्षण द्यायला हवे. ज्यातून नवीन ऑलिंपिक विजेते तयार होतील नि अविस्मरणीय कामगिरी नोंदवतील.
Previous Articleमाजी अष्टपैलू यशपाल शर्मा काळाच्या पडद्याआड
Next Article कोरोनाचा तिसरा उद्रेक ‘आपल्या इच्छेवर’
Tarun Bharat Portal
Parasharam Patil is a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in editorial news, local news entertainment, and political content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.








