ऑनलाईन टीम / तिरुअनंतपुरम :
केरळमध्ये परदेशातून किंवा परराज्यातून आलेल्या आणि संस्थात्मक क्वारंटाईन झालेल्या नागरिकांना क्वारंटाईनसाठी पैसे आकारण्यात येणार आहेत. केरळचे मुख्यमंत्री पिनरई विजयन यांनी याबाबतची माहिती दिली आहे.
विजयन म्हणाले, केरळमध्ये 963 कोरोना रुग्ण आढळले असून, सहा जणांचा मृत्यू झाला आहे. केरळमध्ये बाहेरून येणाऱ्या लोकांचे प्रमाण जास्त आहे. बाहेरून येणारे जे लोक संस्थात्मक क्वारंटाईन होतील, त्यांना सरकार क्वारंटाईनसाठी पैसे आकारणार आहे. कोरोनामुळे राज्याच्या तिजोरीवर भार पडणार आहे. त्यामुळे केरळ सरकार सर्व खर्च उचलण्यास सक्षम नाही.
परदेशातून येणाऱ्या सर्वांसाठी हा नियम लागू असणार आहे. मात्र, इतरांसाठी वेगळा नियम असेल. राज्य सरकार संस्थात्मक क्वारंटाईन होणाऱ्या नागरिकांना पैसे भरण्यासाठी एक श्रेणी तयार करणार आहे. त्यानुसार संबंधितांनी पैसे भरायचे आहेत. केरळमध्ये आतापर्यंत 1 लाखाहून अधिक लोक परराज्यातून आले आहेत. तर 11,189 लोक परदेशातून आले आहेत.









