गोगटे कॉलेजच्या के. के. वेणुगोपाल सभागृहात कार्यक्रमाचे आयोजन
प्रतिनिधी / बेळगाव
संस्कार भारती संस्थेतर्फे शुक्रवार दि. 19 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 5.30 वाजता गोगटे कॉलेजच्या के. के. वेणुगोपाल सभागृहात पं. रामदास पळसुले यांच्या तबला वादनाची मैफल आयोजित करण्यात आली आहे. त्यांना संवादिनीवर चिन्मय कोल्हटकर साथ करणार आहेत. पळसुले यांच्या समवेत त्यांचे शिष्य प्रथमेश अमरुले व हेमंत जोशी साथ करणार आहेत.
कलाकारांचा परिचय पुढीलप्रमाणे रामदास पळसुले
हे संगीत क्षेत्रात उत्कृष्ट तबलावादक म्हणून परिचित आहेत. ते अभियांत्रिकी शाखेचे पदवीधर असून प्रसिद्ध तबलावादक तालयोगी पं. सुरेश तळवलकर यांचे शिष्य आहेत. गेल्या पंचवीस वर्षांपासून गुरुकुल पद्धतीने ते तरुणाईला तबलावादनाचे धडे देत आहेत. पुणे विद्यापीठाच्या सेंटर फॉर परफार्मिंग आर्ट येथे गुरु म्हणून त्यांची नेमणूक झाली आहे.
उत्तर अमेरिकेत भारतीय शास्त्रीय संगीतकार व नर्तकांच्या मैफलीचे ते आयोजन करतात. पं. जितेंद्र अभिषेकी, पं. जसराज, पं. बालसुब्रम्हण्यम्, पं. हरिप्रसाद चौरसीया, पं. बिरजू महाराज, पं. उल्हास, उस्ताद शाहीद परवेज, पं. रोणू मुजुमदार, प्रभा अत्रे, मालिनी राजूरकर यांच्यासह अनेक नामवंत गायक-गायिकांना त्यांनी साथसंगत केली आहे.
चिन्मय कोल्हटकर
चिन्मय हे इलेक्ट्रॉनिक्स पदवीधर असून राजप्रसाद धर्माधिकारी व पं. अरविंद थत्ते यांच्याकडे संवादिनीचे शिक्षण घेतले. गोव्यातील सप्तसूर म्युझिक अकॅडमीचे ते संचालक व प्राचार्य आहेत. पुण्यातील स्टुडिओ मॅजिक नोट व गोव्यातील स्टुडिओ ड्रिमयुनिक येथे साऊंड इंजिनिअर व अरेंजर म्हणून कार्यरत आहेत.
पंडिता रोहिणी भाटे, पं. बिरजू महाराज, पंडिता शमा भाटे, पं. उल्हास कशाळकर, पं. सुरेश तळवलकर, पं. अनिंदो चॅटर्जी, पं. रामदास पळसुले, पं. राजन साजन मिश्रा, गानसरस्वती किशोरी आमोणकर यांच्यासह अनेक गायकांना साथसंगत केली आहे. हा कार्यक्रम सर्वांना खुला असल्याचे संस्कार भारतीने कळविले
आहे.









