देशात दिवसभरात कोरोनाचे नवे 35,871 रुग्ण : सक्रिय रुग्णसंख्या पोहोचली अडीच लाखांवर
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
गेल्या दोन-तीन दिवसांपासून कोरोना संसर्ग पुन्हा झपाटय़ाने वाढत असल्याचे दिसून येत आहे. गेल्या 24 तासात देशात 35 हजार 871 नवे रुग्ण आढळले आहेत. या रुग्णांमध्ये महाराष्ट्रातील 23 हजारांहून अधिक बाधितांचा समावेश आहे. डिसेंबरपासूनची ही आतापर्यंतची एका दिवसातील सर्वाधिक रुग्णसंख्या आहे. नव्या रुग्णवाढीमुळे कोरोना रुग्णसंख्या 1 कोटी 14 लाखांवर पोहोचली असल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आली आहे.
महाराष्ट्रात बुधवारी तब्बल 23 हजार 171 नव्या रुग्णांची नोंद झाली. तसेच 84 जणांचा मृत्यू झाला. मुंबई, पुणे, नाशिक, ठाण्यासह राज्यातील सर्वच भागांमध्ये रुग्ण वाढले आहेत. देशाचा विचार केल्यास केरळ, पंजाब, हरियाणा, कर्नाटक, गुजरात या राज्यांमधील रुग्णसंख्या वाढलेली दिसत आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने गुरुवारी सकाळी जारी केलेल्या आकडेवारीनुसार, देशातील एकूण बाधितांचा आकडा 1 कोटी 14 लाख 74 हजार 605 इतका झाला आहे. तसेच मृतांचा आकडा 172 ने वाढला असून आतापर्यंत 1 लाख 59 हजार 216 जणांचे बळी गेले आहेत. नवे रुग्ण झपाटय़ाने वाढत असतानाच डिस्चार्ज मिळणाऱयांची संख्या स्थिर आहे. बुधवारी दिवसभरात देशभरात 17 हजार 741 रुग्णांना डिस्चार्ज मिळाला असून आतापर्यंत 1 कोटी 10 लाख 63 हजार 25 इतके रुग्ण उपचाराअंती बरे झाले आहेत. नवे रुग्ण आणि डिस्चार्ज मिळणाऱयांमध्ये मोठी तफावत निर्माण झाल्याने देशातील सक्रिय रुग्णसंख्या वाढून 2 लाख 52 हजार 364 इतकी झाली आहे.
नव्या स्ट्रेनचे 400 हून अधिक रुग्ण देशात नव्या स्ट्रेनचे रुग्ण वाढत असल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाने परिपत्रकाद्वारे दिली आहे. ब्रिटन, आफ्रिका आणि ब्राझिलीयन स्ट्रेनचे रुग्ण भारतात वेगाने फैलावत असून आता ही बाधितांची संख्या 400 पर्यंत वाढल्याचे सांगण्यात आले. 4 मार्चपर्यंत देशात नव्या स्ट्रेनचे 242 इतके रुग्ण सापडले होते. मात्र, आता 16 मार्चपर्यंत हा आकडा 158 ने वाढून 400 पर्यंत पोहोचला आहे. नव्या स्ट्रेनचा संसर्गही वाढत असल्याने आरोग्य यंत्रणेसमोरील आव्हाने अधिकच वाढली आहेत.









