ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
दिल्लीत कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने 6-7 जानेवारीला संसदेत अचानक कोरोना चाचणी घेण्यात आली. दरम्यान राज्यसभा सचिवालयातील 65, लोकसभा सचिवालयातील 200 आणि संसदेत काम करणाऱ्या आणखी 133 जणांना अशा 398 जणांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. या पार्श्वभूमीवर राज्यसभेचे अध्यक्ष व्यंकय्या नायडू यांनी नव्याने निर्देश जारी केले आहेत.
राज्यसभेचे अध्यक्ष एम. व्यंकय्या नायडू यांनी सरचिटणीस पीसी मोदी आणि सल्लागार डॉ. पी. पी. के. रामाचार्युलू यांच्यासमवेत परिस्थितीचा आढावा घेतला आणि अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी सचिवालय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांमध्ये कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याचे निर्देश दिले. अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीवर निर्बंध आणले आहेत. ताज्या सूचनांनुसार अप्पर सचिव / कार्यकारी अधिकारी पदावरील 50 टक्के अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना या महिन्याच्या अखेरपर्यंत घरून काम करावे लागेल. ही संख्या एकूण कर्मचाऱ्यांपैकी सुमारे 65 टक्के आहे. अपंग आणि गर्भवती महिलांना कार्यालयात येण्यापासून सूट देण्यात आली आहे. सर्व अधिकृत बैठका या व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे होतील.
दरम्यान, दिल्लीत शनिवारी कोरोनाची 20,181 नवीन प्रकरणे समोर आली असून, गेल्या आठ महिन्यांतील ही सर्वाधिक प्रकरणे आहेत. यापूर्वी 5 मे रोजी एका दिवसात सर्वाधिक 20,960 प्रकरणे नोंदवण्यात आली होती. नवीन प्रकरणांमुळे राष्ट्रीय राजधानीत संसर्ग झालेल्यांची संख्या 5,26,979 झाली आहे. गेल्या 24 तासांत कोरोनामुळे 7 जणांचा मृत्यू झाला असून, मृतांची एकूण संख्या 25,143 आहे.









