निधी पोहोचला 1250 कोटींवर, बांधकाम आराखडय़ात बदल करूनही प्रकल्प वेळेत पूर्ण होणार
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
देशाच्या नवीन संसद भवनाच्या उभारणीचा खर्च जवळपास 29 टक्क्यांनी वाढून 1,250 कोटी रुपयांवर पोहोचला आहे. यापूर्वी हा प्रकल्प 971 कोटींमध्ये पूर्ण करण्याचा आराखडा निश्चित करण्यात आला होता. अतिरिक्त काम, बांधकाम आराखडय़ातील बदल आणि सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांचे पालन आदी कारणांमुळे प्रकल्पावरील खर्च वाढल्याचा दावा करण्यात आला आहे.
केंद्रीय सार्वजनिक बांधकाम विभागाने सुधारित अंदाजित खर्चासाठी लोकसभा सचिवालयाकडून तत्वतः मंजुरी मागितली आहे. यासंबंधी अलीकडेच पाच सदस्यीय पॅनेलसमोर प्रकल्पाच्या खर्चाचे तपशील आणि कामाच्या प्रगतीचा तपशील सादर करण्यात आला होता. मेगा सेंट्रल व्हिस्टा पुनर्विकास प्रकल्पांतर्गत सर्व कामांवर देखरेख ठेवण्यासाठी सरकारने हे पॅनेल स्थापन केले आहे.
प्रकल्पाचे 40 टक्के काम पूर्ण
नवीन संसद भवनाचे काम टाटा यांना 971 कोटी रुपये देण्यात आले असून प्रकल्पाचे 40 टक्के काम पूर्ण झाले आहे. हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी सरकारने ऑक्टोबर 2022 ही मुदत निश्चित केली आहे. हिवाळी अधिवेशन नव्या इमारतीत व्हावे, अशी सरकारची इच्छा आहे. अतिरिक्त काम आणि बांधकाम आराखडय़ात बदल करूनही प्रकल्प पूर्ण करण्याच्या मुदतीत कोणताही बदल झालेला नाही.









