नवी दिल्ली \ ऑनलाईन टीम
राज्यसभेत गदारोळ घालणाऱ्या TMC च्या सहा खासदारांना राज्यसभेचे अध्यक्ष व्यंकय्या नायडू यांनी दिवसभरासाठी निलंबित केलं आहे. आज सकाळी राज्यसभेचे अधिवेशन सुरू झाले तेव्हा या खासदारांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केली. हे सर्व तृणमूल खासदार पेगॅसस वादावर गोंधळ निर्माण करत होते. राज्यसभेचे अध्यक्ष एम व्यंकय्या नायडू यांना वारंवार बोलूनही ते शांत न झाल्याने त्यांना पुर्ण दिवसासाठी निलंबित करण्यात आले.
टीएमसी सदस्य डोला सेन, अर्पिता घोष आणि नदीम उल हक यांच्यासह विरोधी पक्षांतील काही सदस्यांनी फलक घेऊन राज्यसभेत मोदी सरकारविरोधात घोषणा दिल्या. पेगॅसस प्रकरणावर चर्चेची मागणी केली आणि सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणाची तपासणी करावी, अशी मागणी केली. व्यंकय्या नायडूंनी प्रथम सदस्यांना त्यांच्या जागेवर परत जाण्यास सांगितलं. तसंच, फलक लावणाऱ्यांविरुद्ध नियम २५५ लागू करण्याचा इशारा दिला. मात्र, खासदारांनी जाग्यावर बसण्यास नकार दिला. त्यामुळे खुर्चीचा अपमान करणारे आणि फलक उठवणारे नियम २५५ अंतर्गत सभागृहातून बाहेर जातील, असा आदेश दिला.
राज्यसभेने दिलेल्या माहितीनुसार, टीएमसी खासदार डोला सेन, नदिमुल हक, अर्पिता घोष, मौसम नूर, शांता छेत्री आणि अबीर रंजन बिस्वास यांना अव्यवहार्य वर्तनासाठी आजच्या सभागृहाच्या कामकाजामधून माघार घेण्यास सांगण्यात आले आहे. एका अधिकाऱ्याने सांगितले की, ६ टीएमसी खासदारांच्या विरोधात नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. नोटीसमध्ये म्हटले आहे की, सहा टीएमसी खासदारांचे वर्तन सभागृहात पूर्णपणे अव्यवस्थित होते आणि म्हणूनच त्यांना सभापतींनी नियम २५५ अंतर्गत कामकाज सोडून त्वरित वॉकआउट करण्याचे निर्देश दिले आहेत.









