मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आरव्ही विद्यापीठाचे उद्घाटन
बेंगळूर / प्रतिनिधी
बेंगळूर शहरात नव्याने उभारण्यात आलेल्या आर.व्ही. विद्यापीठाचे बुधवारी मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. उद्घाटन कार्यक्रमात मुख्यमंत्री म्हणाले की, आरव्ही विद्यापीठासारख्या उच्च शैक्षणिक संस्थांनी समाजाच्या तसेच राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी सरकारशी सहकार्य़ केले पाहिजे. सध्याच्या काळात सहभागी लोकशाहीची गरज अधोरेखित करताना बोम्माई म्हणाले: “संरचनात्मक लोकशाहीपेक्षा सक्रिय सहभागी लोकशाहीची गरज वाढली आहे. हे केवळ विद्यार्थीच साध्य करू शकतात.” मुख्यमंत्र्यांनी विद्यापीठाला संशोधन आणि विकास उपक्रमांवर अधिक लक्ष केंद्रित करण्याचे आवाहन केले, या उपक्रमांमुळे विद्यापीठाची क्षमता जागतिक स्तरावर दिसून येईल, असेही ते म्हणाले.
उच्च शिक्षण मंत्री डॉ सी.एन. अश्वथ नारायण म्हणाले “ सध्याचे जग हे विकासासाठी दर्जेदार शिक्षणावर अवलंबून आहे, विशेषत: आयटीने प्रत्येक क्षेत्रात पाऊल टाकले आहे. यासाठी कर्नाटक सरकारने वेळोवेळी बदल केले आहेत ज्यामुळे कर्नाटक हे शिक्षण आणि संधींसाठी सर्वाधिक पसंती असलेले ठिकाण बनेल. जगाला उच्च-कुशल मनुष्यबळाची गरज असताना आर.व्ही. विद्यापीठाने योग्य वेळी आपले कार्य सुरू केले आहे.” यावेळी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. एम.के. पांडुरंगा सेट्टी, कुलगुरू प्रा. वाय. एस. आर. मूर्ती आणि प्र-चांसलर ए. व्ही. एस. मूर्ती उपस्थित होते.