वृत्तसंस्था/ लंडन
ऑक्सफोर्डने ‘संविधान’ला 2019 मधील हिंदी शब्द (ऑक्सफोर्ड हिंदी वर्ड ऑफ द ईयर) म्हणून निवडले आहे. ‘संविधान’ला 2019 च्या हिंदी शब्दाच्या स्वरुपात स्थान देण्यामागे त्याचा अर्थ कारणीभूत आहे. एका व्यवस्थेकडून अवलंबिण्यात आलेल्या घटनेच्या आधारावर कुठल्याही राज्य किंवा संघटनेला शासन करण्याची अनुमती देणाऱया दस्तऐवजाला संविधान म्हटले जाते. सर्वाधिक लोकांचे लक्ष वेधून घेणारा तसेच मागील वर्षातील राजकारण तसेच मनोदशा दर्शविणाऱया शब्दाची निवड ऑक्सफोर्डकडून केली जाते.
संविधान हा इंग्रजीतील कॉन्स्टिटय़ूशन या शब्दाचा हिंदी अनुवाद आहे. 2019 च्या हिंदी वर्ड ऑफ द ईयरसाठी ‘संविधान’ योग्य शब्द असून तो सर्वसामान्यांचा कल तसेच धोरणनिर्मात्यांकडे लक्ष आकर्षित करतो. संविधान देशाच्या भावनेचे प्रतीक असून 2019 साल समाजाच्या सर्व घटकांकडून अवलंबिल्या जाणाऱया भावनेचा हा शब्द साक्षीदार आहे. 2019 मध्ये संविधानाच्या आधारावरच लोकशाही, धर्मनिरपेक्षता, न्याय, स्वातंत्र्य आणि समानतेची कसोटी झाल्याचे ऑक्सफोर्डने म्हटले आहे.
जम्मू-काश्मीरमधून कलम 370 हद्दपार करण्यात आल्यावर 5 ऑगस्ट रोजी हा शब्द सर्वप्रथम चर्चेत आला. तसेच मागील वर्षातील सर्वोच्च न्यायालयाच्या अनेक महत्त्वाच्या निर्णयांमध्ये या शब्दाचा उल्लेख झाला आहे. यात शबरीमला खटला, महाराष्ट्रातील बहुमत चाचणी, कर्नाटकातील 17 आमदारांच्या सदस्यत्वासंबंधीचा निर्णय सामील असल्याचे ऑक्सफोर्डने म्हटले आहे.









