महामुनी शुकदेव परिक्षिती राजाला कृष्ण कथा सांगताना पुढे म्हणतात-यानंतर ज्ये÷ गोपांना बलरामांनी आणि कनि÷ गोपांनी बलरामांना नमस्कार केला. ते आपले वय, मैत्री आणि संबंधानुसार सर्वांना भेटले.
मग त्या संवगडियांप्रति । सम्यक् म्हणिजे बरवे रीति ।
रामें येऊनि अतिप्रीती । केली विश्रांति संवादें । हस्ता मेळवूनियां हस्त । संवादती आनंदभरित । विनोदवचनें हास्ययुक्त । पूर्वाचरितस्मारक जीं । हुतुतु हमामाम हुमली । पूर्ववयसेची भोजनकेली । विटीदांडूं चेंडूफळी । क्रीडा पहिली आवडती । ऐसिया विनोदीं सुविश्रान्त । सुखासनीं आनंदभरित । जे जे आले गोप तेथ । ते त्या पुसती अनामय । म्हणती रामा लावण्यधामा। वयस्यवत्सला पूर्णकामा। यादवेंसहित पुरुषोत्तमा । अनामयगरिमा असे कीं ।ऐसें पुसोनि रेवतीरमणा । मग आठवूनियां श्रीकृष्णा । बोलती तें तूं कुरुभूषणा । करिं कां श्रवणा म्हणे मुनि ।
नंतर गोपालांच्याजवळ जाऊन कोणाशी हस्तांदोलन केले. तर कोणाला खूप हसविले. यानंतर जेव्हा बलराम विश्रांतीनंतर निवांत बसले, तेव्हा सर्व गोपाल त्यांच्या जवळ आले. त्यांनी कमलनयन श्रीकृष्णांसाठी सर्व विषयांचा त्याग केला होता. बलरामांनी जेव्हा त्यांच्यासंबंधी आणि त्यांच्या घरच्यांच्यासंबंधी विचारपूस केली, तेव्हा त्यांनी प्रेमाने सद्गदित झालेल्या वाणीने त्यांना विचारले.
उग्रसेनादिकां सर्वां । अनामय पुसती ते यादवां। स्नेहगद्गदवाचा तेव्हां । प्रेमवैकल्य होत्सात्या।कृष्णप्राप्ति अभीष्ट मानी । त्यावीण विषय न रुचे कोणी । वृत्ति वेधूनि गेलिया कृष्णीं । त्याग करूनि विषयांचा । कमलपत्रायताक्ष हरि । सदैव आठवे अभ्यंतरिं । यालागीं विषयाचरणावरी। उद्योग न करी मन बुद्धि ।असो हा आमुचा कळवळा। परस्परें सप्रेमशीळां । जाणों येतसे गोपाळा । भक्तवत्सला भगवंता ।यावरी साफल्य वर्तमान । पुसते झाले बल्लवगण । तें तूं राया करिं श्रवण । म्हणे नंदन व्यासाचा ।बाळपणींच्या सखयांप्रति । आम्हां बान्धवांलागीं श्रीपति । स्त्रीपुत्रेंसीं तुम्ही समस्तीं। केव्हां चित्तीं स्मरिजेतें । आमुचे सहे जे यादव । कुशल आहेत कीं ते सर्व । हरले कंसभयाचें नांव । ऊर्जितदैवप्रसंगें ।
गोपाळ बलरामाला विचारतात – बलरामा ! आमचे सर्व बांधव खुशाल आहेत ना ? आता तुम्ही बायका-मुलांबरोबर राहात असता. तर आमची कधी आठवण येते का ?
ऊर्जित दैवप्रसंग झाला। यास्तव पापी कंस मेला । बंधापासूनि दैवें सुटला। सुहृदमेळा यदुवृष्णी ।पूतनादि कंसपर्यंत। दैवें मारूनि दुष्ट दैत्य । जरासन्धादि नृप समस्त। जिंकिले दृप्त समरंगीं ।दुर्गमदुर्ग द्वारकापुर । आक्रमूं न शकती असुरामर । तेथ केउते नर पामर । भूचर खेचर उरगादि।रत्नाकराचा भंवता परिधि । ब्रह्माण्डगर्भींच्या सर्व समृद्धि । छप्पन्नकोटि यदुगण युद्धीं । जिणिती त्रिशुद्धी कृतान्ता ।ऊर्जित दैवाचें हें फळ । तेणें द्वारका दुर्ग प्रबळ । जोडलें तदाश्रयें यदुकुळ । निर्भय केवळ कळिकाळा ।इत्यादि बहुधा बल्लवगण । पुसती यदुकुळा कल्याण । तंव गोपींहीं संकर्षण । सुखासीन विलोकिला ।
Ad. देवदत्त परुळेकर








