‘मिलिटरी डायरेक्ट’च्या अहवालातून स्पष्ट – चीन जगात बलशाली, अमेरिका दुसऱया क्रमांकावर
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
चीनकडे जगातील सर्वात मजबूत संरक्षण सामर्थ्य असून भारताचा या यादीत चौथा क्रमांक लागतोय असे डिफेन्स वेबसाईट असलेल्या ‘मिलिटरी डायरेक्ट’च्या नव्या अहवालात सांगण्यात आले आहे. भारताने 100 पैकी 61 गुण मिळवले असून अव्वल स्थानी असलेल्या चीनला या 100 पैकी 82 गुण प्राप्त झाले आहेत. अमेरिका 74 गुणांसह दुसऱया तर रशिया 69 गुणांसह तिसऱया क्रमांकावर आहे. विभागवार विचार केल्यास चीनची नेव्ही (नौदल) सर्वात बळकट आहे तर अमेरिकेचे एअर फोर्स (वायूदल) आणि रशियाची आर्मी (लष्कर) सर्वाधिक बळकट असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे.
‘मिलिटरी डायरेक्ट’चा अहवाल तयार करण्यासाठी वेगवेगळय़ा कसोटय़ा लावण्यात आल्या आहेत. त्यामध्ये लष्करावर करण्यात येणारा खर्च, लष्करी सैन्याची संख्या, लष्कर, वायूदल आणि नौदलाकडे असणारी एकूण क्षेपणास्त्रे, सरासरी पगार, लष्करी युद्धसामुग्री आणि त्यांचे वजन अशा अनेक कसोटय़ांच्या आधारे हा अहवाल तयार करण्यात आला आहे. या कसोटय़ांच्या आधारे चीनकडे जगातील सर्वात मजबूत लष्कर असल्याचे स्पष्ट झाले आहे.
‘मिलिटरी डायरेक्ट’च्या क्रमवारीनुसार चीनने पहिले स्थान पटकावले आहे. चीनकडे जगातील सर्वात शक्तिशाली लष्कर असून त्याच्या जवळपास जाणारी लष्करी ताकद अमेरिकेकडे आहे. त्यानंतर भारताकडे संख्यात्मक लष्करी बळ असल्याचे मिलिटरी डायरेक्टने म्हटले आहे. या यादीत फ्रान्स 58 गुणांसह पाचव्या क्रमांकावर आहे. ब्रिटनने या यादीत पहिल्या दहा देशांमध्ये कसेबसे स्थान टिकवले असून 43 गुणांसह तो नवव्या क्रमांकावर आहे.
अमेरिकेकडे लढाऊ विमानांची संख्या 14,141 इतकी आहे. रशियाकडे 4,682 तर चीनकडे 3,587 लढाऊ विमाने आहेत. चीनकडे 406, रशियाकडे 278 तर अमेरिका किंवा भारताकडे 202 युद्धनौका असल्याचेही अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे.
अमेरिकेचा संरक्षणावर सर्वाधिक खर्च
अमेरिका आपल्या संरक्षण सुसज्जतेवर जगात सर्वाधिक खर्च करते. असे असले तरी त्यांना दुसऱया स्थानावर समाधान मानावे लागले. अमेरिका संरक्षणावर सर्वात जास्त म्हणजे 732 अब्ज डॉलर इतका खर्च करते. त्यानंतर चीनचा लष्करावरील खर्च हा 261 अब्ज डॉलर इतका आहे तर भारताचा खर्च हा 71 अब्ज डॉलर इतका आहे.
भारतानेही वाढवला संरक्षणावरील खर्च
गेल्या काही वर्षात भारताने संरक्षणावरील खर्चात मोठी वाढ केली आहे. तथापि, इतर देशांच्या तुलनेत हा खर्च कमीच आहे. एकीकडे पाकिस्तानचा धोका तर दुसरीकडे चीनच्या कुरापती यामुळे भारतीय लष्कराला अत्याधुनिक सुविधांनी सजग ठेवण्यासाठी मोठा खर्च करावा लागत आहे.