वर्षभरात 13 हजार कोटी रुपयांची शस्त्रास्त्रविक्री
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
संरक्षण क्षेत्रात स्वावलंबी होण्याच्या भारताच्या प्रयत्नांना सातत्याने नवे बळ मिळत आहे. विशेषतः देशांतर्गत तंत्रज्ञान विकसित करून ते जगासमोर नेण्याच्या बाबतीत देशाचे संरक्षण क्षेत्र सातत्याने प्रगती करत आहे. दरम्यान, 2021-22 या आर्थिक वर्षातील शस्त्रास्त्रे निर्यातीचे आकडेही संरक्षण क्षेत्रात आत्मनिर्भर होण्याच्या प्रयत्नांना प्रोत्साहन देणारे आहेत. या एका वर्षात भारताने संरक्षण निर्यात क्षेत्रात 13 हजार कोटी रुपयांचा आकडा गाठला. यात विशेष म्हणजे एकूण निर्यातीपैकी 70 टक्के निर्यात खासगी क्षेत्राची असून सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्या केवळ 30 टक्केच निर्यात करू शकल्या आहेत. 2020-21 या आर्थिक वर्षाच्या तुलनेत यात 54.1 टक्क्यांनी वाढ झाली आहे.
संरक्षण उत्पादन विभागाचे अतिरिक्त सचिव संजय जाजू यांनी भारताच्या शस्त्रास्त्रविषयक निर्यातीचा आढावा घेतल्यानंतर आकडेवारी जाहीर केली आहे. कोविड संसर्गामुळे मागील दोन वर्षात निर्यातीवर परिणाम झाला होता. मात्र, आता परिस्थिती नियंत्रणात आली आहे. पाच वर्षांपूर्वीच्या तुलनेत 2021-22 या आर्थिक वर्षात भारताने संरक्षण निर्यातीत आठपटीने वाढ केली आहे. 2020-21 मध्ये भारताची संरक्षण निर्यात 8 हजार 434 कोटी रुपयांची होती, तर 2019-20 मध्ये ती 9 हजार 115 कोटी रुपयांवर पोहोचली आहे. 2015-16 या आर्थिक वर्षात भारताची संरक्षण निर्यात केवळ 2 हजार 059 कोटी रुपयांची होती.
भारताची संरक्षण निर्यात प्रामुख्याने अमेरिका, फिलिपाईन्स, दक्षिण पूर्व आशिया, मध्य पूर्व आणि आफ्रिका या देशांना होते. खासगी क्षेत्रातील कंपन्यांनी जवळपास 70 टक्के निर्यात करून चांगली कामगिरी केली आहे. या वषी जानेवारीमध्ये भारताने फिलिपाईन्ससोबत 375 दशलक्ष डॉलर्सचा (सुमारे 2,770 कोटी रुपये) किमतीचा करार केला होता. याअंतर्गत भारताने फिलिपाईन्सला ब्रह्मोस सुपरसॉनिक क्षेपणास्त्रांचा पुरवठा करण्याचा करार केला आहे.
75 नवीन विकसित संरक्षण उत्पादने लाँच होणार
संरक्षणमंत्री राजनाथ सिंग उद्या, सोमवारी दिल्लीतील विज्ञान भवन येथे संरक्षण उत्पादन विभाग, संरक्षण मंत्रालयाने आयोजित केलेल्या पहिल्या ‘आर्टिफिशियल इंटेलिजेंस इन डिफेन्स’ परिसंवाद आणि प्रदर्शनाचे उद्घाटन करतील. याप्रसंगी संशोधन संस्था, उद्योग, स्टार्ट-अप आणि नवोन्मेषकांनी विकसित केलेली अत्याधुनिक उत्पादने लाँच केली जाणार आहेत. हा एक मेगा इव्हेंट असून स्वातंत्र्याच्या 75 वर्षांच्या उत्सवाचा भाग म्हणून 75 नवीन-विकसित एआय उत्पादनांचे सादरीकरण केले जाणार आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून ‘आझादी का अमृत महोत्सव आणि संरक्षण क्षेत्रातील ‘आत्मनिर्भर भारत’ उपक्रमाला प्रोत्साहन दिले जाणार आहे.








