अनेक देशांना निर्यात करणार ब्राह्मोस क्षेपणास्त्र : फिलिपाईन्सपासून सुरुवात
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
संरक्षण जगतात भारताचा प्रभाव आगामी काळात अधिकच वाढणार आहे. भारत आणि रशियाच्या संयुक्त प्रकल्पाच्या अंतर्गत विकसित करण्यात आलेले सुपरसोनिक क्रूज क्षेपणास्त्र ब्राह्मोस पुढील वर्षांपर्यंत फिलिपाईन्सला निर्यात करण्यात येणार आहे. रशियाचे डेप्युटी चीफ ऑफ मिशन रोमन बाबुश्किन यांनी याची पुष्टी दिली आहे. फिलिपाईन्ससह अन्य अनेक देशांनीही या सुपरसोनिक क्षेपणास्त्राकरता स्वारस्य दर्शविले आहे. ब्राह्मोस क्षेपणास्त्र पाणबुडी, युद्धनौका, विमान किंवा जमिनीवरूनही डागण्यात येऊ शकते.
काही दिवसांमध्येच फिलिपाईन्ससोबत पहिल्या करारावर स्वाक्षरी करण्यात येणार आहे. पुढील वर्षाच्या प्रारंभापर्यंत फिलिपाईन्सला क्षेपणास्त्रांचा पुरवठा करण्यात येणार आहे. पुढील वर्षी होणाऱया परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि फिलिपाईन्सचे अध्यक्ष रॉड्रिगो दुतर्ते सामील होतील.
परिषदेची तयारी सुरू
मनीला दौऱयावर जाणाऱया ब्राह्मोस एअरोस्पेसचे पथक कराराशी संबंधित अडचणी जाणून घेऊन त्या सोडविणार आहे. आगामी परिषदेत या कराराला अंतिम स्वरुप देण्याचा प्रयत्न आहे. मोदी आणि दुतर्ते यांच्यात होणाऱया परिषदेची तारीख निश्चित झालेली नाही, परंतु फेब्रुवारीमध्ये परिषदेचे आयोजन होण्याची शक्यता असल्याचे सांगण्यात आले.
अनेक देशांना स्वारस्य
ब्राह्मोस पुरवठय़ाबद्दल भारताची फिलिपाईन्ससोबत दीर्घकाळापासून चर्चा सुरू आहे. दोन्ही देशांदरम्यान या करारासंबंधी अनेक टप्प्यात चर्चा झाली आहे. अनेक आखाती देशांनीही या सुपरसोनिक क्षेपणास्त्राच्या खरेदीकरता स्वारस्य दर्शविले आहे. भारताने यापूर्वीच अनेक ब्राह्मोस क्षेपणास्त्रांना लडाख आणि अरुणाचलमध्ये चीनला लागून असलेल्या सीमेवर तैनात केले आहे.
ब्राह्मोसच्या नव्या आवृत्तीची चाचणी
मागील काही आठवडय़ांपासून विविध ठिकाणी क्षेपणास्त्रांच्या नव्या आवृत्तीची चाचणी सुरू होती. नव्या आवृत्तीत क्षेपणास्त्राचा मारक पल्ला 290 किलोमीटरवरून वाढवत 400 किलोमीटर करण्यात आला आहे. परंतु याचा 2.8 मॅकचा वेग ध्वनीच्या वेगापेक्षा तीनपट अधिक आहे.