अनेक देशांसोबत होत आहेत भारताचे युद्धाभ्यास
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
बदलत्या जागतिक स्थितीदरम्यान भारत आता उघडपणे मैदानात उतरून सक्रीय भूमिका बजावण्याच्या धोरणावर वेगाने पावले टाकत आहे. भारताचा बदलता दृष्टीकानात आता युद्धाभ्यासांच्या आघाडीवरही दिसून येतो. भारत अभूतपूर्व संख्येत द्विपक्षीय आणि बहुपक्षीय सैन्य अभ्यासांमध्ये भाग घेणार आहे. चालू वर्षात जगातील अनेक देशांसोबत भारताचे युद्धाभ्यास होणार आहेत. संरक्षण कूटनीति (डिफेन्स डिप्लोमसी), सामरिक संकेत (स्ट्रटेजिक सिग्नलिंग) इत्यादी गोष्टींवर आता मोठय़ा प्रमाणावर भर दिला जात आहे.
भारताने मागील वर्षी मे महिन्यात पूर्व लडाखमध्ये हिंसक झटापट झाल्यापासून चीनसोबतच्या द्विपक्षीय युद्धाभ्यासाला स्थगिती दिली असली तरीही अन्य देशांसोबतचे संरक्षण सहकार्य वाढविले आहे. युद्धाभ्यासांमुळे युद्धकौशल्य वाढविणे, जागतिक स्तरावरील सर्वोत्तम व्यवस्था आणि रणनीति अवलंबिण्यासह विविध देशांसोबत सैन्य आणि सामरिक सहकार्य, विश्वास निर्मिती आणि परस्पर निर्भरतेला बळ मिळते. संरक्षण कूटनीति भारताच्या कूटनीतिक हितसंबंधांना चालना देण्याचे साधन असल्याचे एका सैन्याधिकाऱयाने म्हटले आहे.
आफ्रिकेत चीनशी स्पर्धा
भारताने आफ्रिकेतील स्वतःचा वावर वाढविणे सुरु केले आहे. या खंडात चीनने पूर्वीच स्वतःचे प्रभुत्व निर्माण केले आहे. याचमुळे भारताने आफ्रिकन देशांसोबत युद्धाभ्यासाची रणनीति स्वीकारली आहे. याचा उद्देश चीनला सामरिक संकेत देणे देखील आहे. मागील वर्षी ऑगस्ट महिन्यात मालाबार युद्धाभ्यासाद्वारे भारताने चीनला योग्य तो संदेश दिला होता.
युद्धाभ्यासांचा धडाका
भारत चालू वर्षात अनेक संयुक्त युद्धाभ्यासांमध्ये सामील होईल. पुढील महिन्यात बंगालच्या उपसागरात क्वाड फ्लस युकेसोबत सागरी युद्धाभ्यास होणार आहे. त्यानंतर ब्रिटनसोबत तिन्ही संरक्षण दलांचा युद्धाभ्यास आयोजित होईल. 24-27 ऑक्टोबर रोजी होणाऱया या युद्धाभ्यासांच्या केंद्रस्थानी 65,000 टन वजनी विमानवाहू युद्धनौका एचएमएस क्वीन एलिझाबेथ आणि पाचव्या पिढीचे लढाऊ विमान एफ-35 बी असणार आहे. भारताने आतापर्यंत केवळ अमेरिका आणि रशियासोबतच तिन्ही संरक्षण दलांचा युद्धाभ्यास केला होता हे विशेष.
सैन्याचे युद्धसराव

भारतीय सैन्याने अलिकडेच रशियात ‘इंद्र’ तर कजाकिस्तानात ‘काजिंद’ युद्धसराव केला आहे. रशियात सध्या 17 देशांचा ‘झापड’ युद्धाभ्यास सुरू असून यात भारताच्या 2 हजार सैनिकांनी भाग घेतला आहे. याचबरोबर नोव्हेंबर महिन्यापर्यंत नेपाळसोबत ‘सूर्य किरण’, श्रीलंकेसोबत ‘मित्र शक्ती’, ब्रिटनसोबत ‘अजेय वॉरियर’, अमेरिकेसोबत ‘युद्ध अभ्यास’ आणि फ्रान्ससोबत ‘शक्ती’ या नावाने युद्धाभ्यास होणार आहे.
नौदल आघाडीवर

भारतीय नौदलाने चालू वर्षात व्हिएतनाम, इंडोनेशिया, फिलिपाईन्स, सिंगापूर आणि थायलंडपासून केनिया, युएई, कतार, ब्रुनेई, बहारीन, इजिप्त, ब्रिटन आणि जर्मनीसोबत सागरी युद्धाभ्यास केला आहे. भारतीय युद्धनौकांनी पहिल्यांदाच सौदी अरेबिया, अल्जीरिया, सूदान आणि युरोपीय महासंघ नेव्हल टास्कफोर्ससोबत युद्धाभ्यासांमध्ये भाग घेतला आहे.
वायुदल देखील सक्रीय
भारतीय वायुदलाने मार्च महिन्यात अमेरिका, फ्रान्स, युएई, सौदी अरेबिया आणि बहारीनसोबत अलद दाफ्रा वायुतळावर संचालित झालेल्या युद्धाभ्यासाकरता सुखोई-30एमकेआय लढाऊ विमान आणि सी-17 ग्लोबमास्टर-3 विमाने पाठविली होती.









