जागतिक नेत्यांपैकी केवळ ट्रम्प उपस्थित राहणार
वृत्तसंस्था/ संयुक्त राष्ट्रसंघ
संयुक्त राष्ट्रसंघाच्या महासभेच्या आभासी बैठकीला पंतप्रधान नरेंद मोदी 26 सप्टेंबर रोजी संबोधित करू शकतात. 193 सदस्य देशांच्या जागतिक संस्थेने उच्चस्तरीय बैठकीसाठी वक्त्यांची तात्पुरत्या स्वरुपातील यादी जाहीर केली आहे. या बैठकीला वैयक्तिक स्वरुपात हजर राहून संबोधित करणारे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे यंदा एकमात्र नेते ठरणार आहेत.
संयुक्त राष्टसंघाच्या 75 वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच महासभेचे वार्षिक अधिवेशन ऑनलाईन माध्यमातून होत आहे. कोरोना महामारीमुळे यंदा देश आणि शासनप्रमुख या महासभेत वैयक्तिक स्वरुपात हजर राहू शकणार नाहीत. जागतिक नेते या अधिवेशनासाठी पूर्वीचे रिकॉर्ड करण्यात आलेली स्वतःच्या संबोधनाची चित्रफित सोपविणार आहेत.
वक्त्यांच्या यादीनुसार पंतप्रधान मोदी 26 सप्टेंबर रोजी सकाळी स्वतःचे संबोधन करु शकतात. यादीनुसार ब्राझीलचे अध्यक्ष जायर बोल्सोनारो पहिले वक्ते असणार आहेत. अमेरिका पारंपरिकदृष्ठय़ा सर्वसाधारण चर्चेच्या पहिल्या दिनी दुसरा वक्ता असतो. चालू महिन्यात होणाऱया जागतिक नेत्यांच्या संयुक्त राष्ट्रसंघ महासभेसह सुरक्षा परिषदेची एक उच्चस्तरीय शिखर बैठकही आयोजित होणार आहे.









