वृत्तसंस्था/संयुक्त राष्ट्रसंघ :
संयुक्त राष्ट्रसंघ सुरक्षा परिषदेत पाकिस्तानचा भारत विरोधातील आणखी एक डाव अपयशी ठरला आहे. पाकिस्तानने 2 भारतीयांना दहशतवादी घोषित करण्याचा प्रस्ताव मांडला होता, जो सुरक्षा परिषदेने फेटाळला आहे. संयुक्त राष्ट्रसंघातील भारताचे स्थायी प्रतिनिधी टी.एस. तिरुमूर्ती यांनी ही माहिती एका ट्विटद्वारे दिली आहे.
चालू वर्षात पाकिस्तानने दुसऱयांदा अशाप्रकारची आगळीक केली आहे. दोन्ही वेळेला दोन भारतीयांना दहशतवादी ठरविण्याचा प्रयत्न केला आणि दोन्हीवेळा पाकिस्तान जागतिक संस्थेत तोंडघशी पडला आहे.

सुरक्षा परिषदेची एक समिती असून त्याला 1267 कमिटी म्हटले जाते. ही समिती दहशतवादी कारवायांमध्ये सामील कुठल्याही देशाच्या नागरिकांना प्रतिबंधित यादीत सामील करू शकते. संबंधित आरोपांचा तपास केल्यावरच अनेक प्रकारचे निर्बंध लादले जातात. यात प्रवासबंदी आणि बँक खाती गोठविण्याचा प्रकार सामील आहे. भारतीय नागरिक अंगारा अप्पाजी आणि गोविंदा पटनायक यांना दहशतवादी ठरविण्यासाठी पाकने प्रस्ताव मांडला होता.
चालू वर्षात पाकिस्तानने एकूण 4 भारतीयांना दहशतवादी घोषित करण्याचा कट रचला होता. हे चारही जण अफगाणिस्तानात कार्यरत आहेत. अफगाणिस्तानात तालिबानच्या मदतीने भारताला बदनाम करण्याचा प्रयत्न पाकिस्तानने चालविला आहे. पाकिस्तानचा डाव वेळीच ओळखून भारतीय गुप्तचर यंत्रणांनी चारही जणांना एका गोपनीय मोहिमेच्या अंतर्गत भारतात आणले आहे.
पाकला समर्थन नाही

सुरक्षा परिषदेत सामील अमेरिका, ब्रिटन, जर्मनी आणि बेल्जियमने पाकिस्तानचा हा प्रस्ताव फेटाळून लावत यावरील पुढील प्रक्रियाही रोखली आहे. 1267 कमिटीचा वापर पाकिस्तान राजकारणासाठी करू इच्छितो, तसेच याला धार्मिक रंग देण्याचा त्याचा प्रयत्न आहे. परंतु सुरक्षा परिषदेने पाकिस्तानचा हा कट यशस्वी होऊ दिलेला नाही, असे तिरुमूर्ती यांनी सांगितले आहे.
भारताला मात्र यश
भारताने सुरक्षा परिषदेत जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या मसूद अझहरच्या विरोधात ठोस पुरावे सादर करत तो भारतात दहशतवादी हल्ले घडवून आणण्याच्या कटात सामील असल्याचे सिद्ध केले होते. भारताने सादर केलेल्या पुराव्यांमुळे अझहरचे अल-कायदा आणि तालिबानशी संबंध असल्याचे स्पष्ट झाले होते. सुरक्षा परिषदेने जैशच्या म्होरक्याला जागतिक दहशतवादी घोषित केले होते. पाकिस्तान आता भारताकडून याचाच सूड उगविण्याचा प्रयत्न करत आहे.








