ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
संयुक्त किसान मोर्चाने जजपा-भाजप नेत्यांसाठी गावबंदी जाहीर केली आहे. तसेच या नेत्यांना त्यांच्या गावांव्यतिरिक्त इतर कोणत्याही गावात प्रवेश करू देऊ नये, असे गावकऱ्यांना आवाहन करण्यात आले आहे. 26 जूनला शेतकरी आंदोलनाला सात महिने पूर्ण होत असल्याने शेतकरी विविध राज्यातील राजभवनांसमोर निदर्शने करून राज्यपालांमार्फत राष्ट्रपतींना निवेदन पाठवणार आहेत.
संयुक्त किसान मोर्चाची शुक्रवारी कुंडली बॉर्डरवरील आंदोलनस्थळी बैठक झाली. त्यानंतर शेतकरी नेते इंद्रजित सिंग म्हणाले की, 24 जूनला संत कबीर यांची जयंती साजरी केली जाईल. त्यासाठी मागासवर्गीय आणि अनुसूचित जातीजमातीच्या लोकांना आंदोलनस्थळांवर आमंत्रित केले जाईल. 26 जूनला ‘शेती वाचवा- लोकशाही वाचवा’ दिन साजरा केला जाईल. त्याअंतर्गत राज्यातील विविध राजभवनांसमोर निदर्शने करण्यात येणार असून, राज्यपालांमार्फत राष्ट्रपतींना निवेदन देण्यात येणार आहे.