ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
शेतकरी आंदोलनाची पुढील रणनीती आखण्यासाठी संयुक्त किसान मोर्चाची आज दिल्लीच्या सिंधू बॉर्डरवर होणारी बैठक रद्द करण्यात आली आहे. ही बैठक 4 डिसेंबर रोजी याच ठिकाणी होणार आहे.
वादग्रस्त ठरलेले तिन्ही कृषी कायदे रद्द करण्याचे विधेयक संसदेच्या दोन्ही सभागृहात मंजूर करण्यात आले. केंद्र सरकारने शेतकऱ्यांची ही महत्त्वाची मागणी केल्याने काही शेतकरी संघटना आंदोलन मागे घेण्याच्या विचारात आहेत. मात्र, एमएसपी कायदा आणि जवळपास 10 हजार शेतकऱ्यांवर दाखल झालेले गुन्हे मागे घेण्यासाठी काही शेतकरी संघटना आग्रही असून, त्यांनी आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
आंदोलनातून माघार घेणाऱ्या संघटना एकमत घडवण्याचा प्रयत्न करत आहेत. 20-22 संघटनांचे आंदोलन मागे घेण्यावर एकमत झालं आहे तर 8-10 संघटना उर्वरित मागण्या पूर्ण होईपर्यंत आंदोलन सुरुच ठेवण्याचा विचार करत आहेत. त्यामुळे आंदोलनाची पुढील रणनीती निश्चित करण्यासाठी आज 32 शेतकरी संघटनांची बैठक होणार होती. मात्र, ही बैठक रद्द झाली असून ती 4 डिसेंबरला सिंधू बॉर्डरवर होणार आहे.