जुलैमध्ये प्रचंड नफा मिळवून, निफ्टीने ऑगस्ट महिन्याची सुरूवात तर सकारात्मक केली आहे. गेल्या आठवडय़ातील पाच सत्रांमध्ये निफ्टी 374 अंकांच्या मर्यादेत फिरत होता. आठवडय़ाच्या शेवटी अल्प तेजी दर्शवत तो बंद झाला. दैनिक आणि सप्ताहाचे चार्ट पाहिले तर सूचकांक दोन्ही ठिकाणी न्यूनतम पातळीच्या वरच राहिला. वरच्या स्तरावर नफा मिळवण्याचा कल राहिला तरीही कोणत्याही बाजूने सूचकांकांची निश्चित अशी चाल दिसली नाही.
सेन्सक्स आणि निफ्टी या दोन्हीमध्ये गेल्या आठवडय़ाच्या शेवटच्या दिवशी अगदी अल्प तेजी दर्शवली, सेन्सक्समध्ये 15 अंकाची आणि निफ्टीत 13 अंकांची अल्प तेजी होती. निफ्टीला 11300 चा पल्ला गाठता आला नाही. आता आजपासून सुरू होणाऱया आठवडय़ात निफ्टीची वाटचाल सकारात्मकच असणार आहे. ढोबळमानाने सांगायचे तर गेल्या आठवडय़ात मिडकॅप कंपन्यांनी निफ्टीला सावरले. जवळजवळ 100 मिडकॅप कंपन्या 200 पेक्षा जास्त अंकाची बढत मिळवून होत्या. तर 21 मिडकॅप कंपन्या त्यांच्या तीन महिन्यातील सर्वोच्च पातळीवर होत्या. याचा अर्थ मिडकॅप म्हणजे मध्यम कंपन्या मजबूत स्थितीत आहेत आणि त्यांचाच आधार याही आठवडय़ात मिळेल. कोरोना विषाणूचे भय अजूनही संपलेले नाही, उलट वाढतच आहे. कोविड-19 वर लस लवकरच येईल ही आशा आहे. आणि त्यामुळेच बाजारांत आशावाद टिकून आहे. नजिकच्या काळात लॉकडाऊन संपुष्टात येईल अशीही अपेक्षा आहे. अर्थव्यवस्था सुरळीत व्हायची असेल तर लॉकडाऊनचा अडथळा दूर करण्याची आवश्यकता आहे. शेअर बाजारांत विविध क्षेत्रांचा विचार केला तर फार्मा आणि आयटी सध्या चांगलेच तेजीत आहेत. एक तर कोविड-19च्या काळात फार्मा क्षेत्रानेच चांगली कामगिरी बजावलेली आहे. त्यामुळे अनिश्चिततेच्या काळात फार्माचा आधार गुंतवणूकदारांना मिळाल्याचे चित्र आहे. तीच गोष्ट आयटी कंपन्यांची आहे. आयटी कंपन्याही चांगल्याच तेजीत आहेत. डॉलर मजबूत होणे हे या दोन्ही क्षेत्रांसाठी सहाय्यभूत ठरले आहे.
ढासळती अर्थव्यवस्था आणि तेजीतील शेअर बाजार असे विसंगत चित्र सध्या दिसत आहे. सोन्याचा दरही 56 हजारावर गेला आहे. अर्थव्यवस्था अस्थिर झाल्याने अमेरिकेसारखे देशही सोन्यात गुंतवणूक करू लागले आहेत आणि त्यामुळे सोन्याचे दर गगनाला भिडले आहेत.
शेअर बाजारातही रोखतेचे प्रमाण वाढल्याने ते तेजीत आहेत. जोपर्यंत स्वस्त रोखे उपलब्ध आहेत तोपर्यंत अर्थव्यवस्था आणि शेअर बाजार यांच्यातील विसंगती दिसून येईल. पण जेव्हा ही रोखता आटेल तेव्हा बाजारांत करेक्शन येईल.
बाजारांत विविध कंपन्यांचे दर खूप कमी झाले आहेत आणि पैशाची आवकही वाढली आहे. मिडकॅप आणि स्मॉलकॅप कंपन्यांचे शेअर्स खूप स्वस्त दरात मिळत आहेत. त्यामुळे गुंतवणूकदारांचा ओढा या कंपन्यांकडे जास्त आहे. याही आठवडय़ात मिडकॅप कंपन्यांचाच बोलबाला असेल असे दिसत आहेत.
जागतिक स्तरावर चीनला घेरण्याची रणनीती अमेरिकेपासून जपानपर्यंत सर्व देशांनी आखली आहे. चीनची कोंडी करण्यात या देशांना कितपत यश येते त्यावर जागतिक राजकारणाची दिशा ठरेल. भारत जागतिक स्तरावर महत्वाची भूमिका बजावत आहे हेही स्पष्ट दिसत आहे. गेल्या आठवडय़ात मिडकॅप आणि स्मॉलकॅप कंपन्यांचाच बोलबाला होता. याही आठवडय़ात तोच टेड असेल. फार्मा आणि आयटी कंपन्यांवर लक्ष केंद्रीत करावे. डॉ. रेड्डीज, टीसीएस आणि आयटीसी या कंपन्यांत गुंतवणूक फायदेशीर ठरेल. त्याचबरोबर अपोलो टायर्स, पीआय इंडस्ट्रीज, इमामी, सिपला या कंपन्यांचे शेअर्सही खरेदी करणे योग्य ठरेल. जेके लक्ष्मी सिमेंट, लुपिन या कंपन्यांमधील गुंतवणूकही फायद्याची ठरेल.
या आठवडय़ात शेअर बाजारात अल्पकाळासाठी करेक्शन येण्याची शक्मयता आहे. जोपर्यंत बाजारात रोखतेचा ओघ चालू आहे तोपर्यंत बाजाराचा कल तेजीकडेच असणार आहे. तशीच महत्वाची काही विपरीत घटना घडल्याशिवाय बाजारात पडझड होण्याची शक्मयता
नाही.









