विविध उपाययोजनांचे आयोजन, खासगी- सरकारी इस्पितळात 2 हजार 796 बेड उपलब्ध
प्रतिनिधी /बेळगाव
कोरोना महामारीची संभाव्य तिसरी लाट थोपविण्यासाठी व प्रसंगी तिचा सामना करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने तयारी केली असून खासगी व सरकारी इस्पितळात 2 हजार 796 बेड उपलब्ध आहेत. या प्रयत्नांचाच एक भाग म्हणून सोमवारी एका दिवसात सुमारे 41 हजार 880 मुलांना लस देण्याचे उद्दिष्ट ठरविण्यात आले आहे.
रविवारी रात्री आरोग्य विभागाने यासंबंधीची माहिती दिली आहे. एकीकडे लसीकरणाचा वेग वाढविण्याबरोबरच संभाव्य लाटेचा सामना करण्यासाठी आवश्यक तयारी करण्यात आली आहे. 33 लाख 31 हजार 383 जणांना पहिला तर 29 लाख 53 हजार 599 जणांना दुसरा डोस देण्यात आला आहे.
परराज्यातून कामासाठी जिल्हय़ात आलेल्यांनाही लस देण्यात येत आहे. सोमवार दि. 3 जानेवारीपासून 15 ते 18 वयोगटातील मुलांना कोव्हॅक्सिन देण्यासंबंधी शिक्षण खात्याच्या अधिकाऱयांशी संपर्क साधून तयारी करण्यात आली आहे. जिल्हय़ातील 2 लाख 47 हजार मुलांना लस देण्यात येणार असून सोमवारी चालना देण्यात येणार आहे. पहिल्या दिवशी 298 शाळा-कॉलेजमध्ये 41 हजार 880 मुलांना लस देण्याचे उद्दिष्ट आहे.
कोरोनाच्या दुसऱया लाटेत बाधितांवर वेळेत उपचार मिळाले नाहीत. त्यामुळे रुग्णांचे हाल झाले. संभाव्य तिसऱया लाटेच्यावेळी त्याची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून तयारी करण्यात आली आहे. जिल्हय़ातील सरकारी इस्पितळात 1224 व खासगी इस्पितळात 1572 असे 2 हजार 796 बेड उपलब्ध आहेत. लहान मुलांसाठीही 780 जनरल बेड, 207 पीआयसीयु, 297 एनआयसीयु, 44 व्हेंटिलेटर, 39 एनआयव्हीएस सज्ज ठेवण्यात येणार आहेत.
ऑक्सिजन उपलब्ध करण्यासाठी खबरदारी घेण्यात आली आहे. जिल्हय़ात तीन सरकारी व दोन खासगी अशा एकूण पाच प्रयोगशाळांत स्वॅब तपासणी सुरू आहे. 23 डिसेंबरपासून जिनोम सिक्वेन्सिंग प्रयोगशाळा सुरू आहे. तर जिल्हय़ातील 26 सरकारी इस्पितळात 724 सामान्य बेड, 44 आयसीयु, 88 व्हेंटिलेटर व 422 ऑक्सिजन असे 1278 बेड उपलब्ध आहेत.









