जलवाहिनीसाठी खोदलेल्या चरीमुळे अडचणीत भर
प्रतिनिधी /बेळगाव
एकीकडे शहरातील विविध रस्त्यांचे काँक्रिटीकरण करून स्मार्ट रोड बनविण्यात येत आहेत. तर दुसरीकडे रस्ते खोदण्यात आल्याने रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. खासबाग, संभाजी रोडचा रस्ता उखडला असून सर्वत्र खड्डे निर्माण झाले आहेत. अशातच जलवाहिन्या घालण्यासाठी खोदाई करण्यात आल्याने रस्त्याची दैना झाली आहे.
रस्त्याचे रुंदीकरण करून डांबरीकरण करण्यात आले होते. डांबरीकरण करण्यात आलेल्या काही महिन्यांतच रस्ता खचला आहे. तसेच ठिकठिकाणी खड्डे निर्माण झाले होते. त्यामुळे डांबरीकरणाचे काम निकृष्टदर्जाचे झाल्याची बाब चव्हाटय़ावर आली होती. रस्त्याचे डांबरीकरण करण्याची मागणी सातत्याने करण्यात आली. मात्र खचलेल्या रस्त्याचे डांबरीकरण आजपर्यंत झाले नाही. त्यामुळे जुन्या धारवाड रोडला जोडणाऱया परिसरात संभाजी रोडवर खड्डय़ांचे साम्राज्य निर्माण झाले आहे. हा रस्ता ठिकठिकाणी खराब झाला होता. डेनेज चेंबर व जलवाहिन्या जोडणीसाठी ठिकठिकाणी चरी खोदण्यात आल्या होत्या. त्यामुळे वाहनधारकांना अडचणीचे बनले होते.
अलीकडे या रस्त्यावर जलवाहिनी घालण्यासाठी खोदाई करण्यात आली आहे. रस्त्याच्या मध्यभागी संपूर्ण रस्ता खोदण्यात आला आहे. त्यामुळे रस्ता खराब झाला असून रस्त्याची दुरुस्ती कधी होणार? असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. शहरातील विविध रस्त्यांचे काँक्रिटीकरण करून स्मार्ट रोड बनविण्यात येत आहेत. मात्र निर्माण झालेले खड्डे बुजविण्याकडे दुर्लक्ष झाले असताना आता जलवाहिनीसाठी खोदण्यात आलेल्या रस्त्याचे डांबरीकरण कधी करणार? असा मुद्दा उपस्थित झाला आहे. खड्डेमय रस्त्यांमुळे वाहनधारकांची गैरसोय होत असून रस्त्याचे डांबरीकरण तातडीने करण्यात यावे, अशी मागणी होत आहे.









