प्रतिनिधी/ बेळगाव
खासबाग, संभाजी रोड येथील व्हॉल्वद्वारा मोठय़ा प्रमाणात पाणी वाहत असल्याने दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले होते. मात्र, सदर दुरुस्तीचे काम व्यवस्थित झाले नसल्याने बुधवारी पुन्हा मोठय़ा प्रमाणात गळती लागून पाणी वाया गेले. याबाबतची माहिती दुरुस्ती करणाऱया कामगारांना दिली असता त्यांनी दुर्लक्ष केले.
शहरातील विविध ठिकाणी व्हॉल्वमधून मोठय़ा प्रमाणात पाणी वाहत आहे. काही ठिकाणी जास्त पाणी वाया जात असल्याने पाणीपुरवठा मंडळाच्यावतीने दुरुस्तीचे काम करण्यात येत आहे. खासबाग संभाजी रोड येथील व्हॉल्वच्या दुरुस्तीचे काम मंगळवारी सुरू केले होते. यावेळी सदर ठिकाणच्या व्हॉल्वची दुरुस्ती करण्यात आली होती. पण दुरुस्तीचे काम व्यवस्थित झाले नाही.
बुधवारी पाणीपुरवठा करण्यात आला असता व्हॉल्वमधून पाणी वाहू लागले. त्यामुळे परिसरातील रहिवाशांना पाणी मिळाले नाही. परिसरात सोडण्यात आलेले पाणी व्हॉल्वमधून वाहून गेले. त्यामुळे याबाबतची माहिती पाणीपुरवठा मंडळाच्या अधिकाऱयांना दिली असता पाणीपुरवठा बंद करण्यात आला. दुरुस्ती करणाऱया कामगारांना याची माहिती देण्यात आली. मात्र दुरुस्ती करणारे कामगार याकडे फिरकलेच नाहीत. त्यामुळे बुधवारी दुरुस्तीचे काम झाले नाही.
अर्धवट दुरुस्ती कामामुळे रहिवाशांना पाणी टंचाईच्या समस्येला सामोरे जावे लागले. पाणीपुरवठा मंडळाच्या कारभाराबद्दल नाराजी व्यक्त करण्यात आली. या जलवाहिनीद्वारे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जातो. त्यामुळे व्हॉल्वच्या दुरुस्तीचे काम तातडीने करून पाणीपुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी करण्यात येत आहे.









