पंढरपुरातून प्रारंभ, परतीच्या पावसाने फटका बसलेल्या शेतकऱ्यांचे पुसणार अश्रू
नुकसानीची पाहणी करून सरकारकडे करणार मदतीची मागणी
प्रतिनिधी / कोल्हापूर
मराठा आरक्षणाच्या लढ्यातील आक्रमक भूमिकेमुळे राज्यभर बहुचर्चित बनलेले खासदार संभाजीराजे छत्रपती शनिवारपासून (दि. 17) परतीच्या पावसाने पीक नुकसान झालेल्या जिल्ह्यांच्या पाहणी दौऱ्याला प्रारंभ करणार आहे. शनिवारी घटस्थापनेने नवरात्रोत्सवाला प्रारंभ होत असताना संभाजीराजे यांनी थेट शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत जावून त्यांचे अश्रू पुसण्यासाठी सुरू केलेल्या या दौऱ्याची राज्यभर चर्चा सुरू झाली आहे. दरम्यान, या दौऱ्यात शेतकऱ्यांशी संवाद साधून झालेल्या पीक नुकसानीची माहिती घेणार आहेत. विठ्ठलाच्या पंढरपुरातून हा दौरा सुरू होणार आहे.
गेल्या पाच दिवसांत राज्यात परतीच्या पावसाने अचानक दिलेल्या दणक्यामुळे पश्चिम महाराष्ट्रासह मराठवाडा, विदर्भातील जिल्ह्यांना फटका बसला. शेतकऱ्यांच्या पिकांचे प्रचंड नुकसान झाले. शेतात आडवी झालेली पिके कुजण्यास सुरूवात झाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. राज्यात ओला दुष्काळ जाहीर करण्यात यावा, शेतकऱ्यांना मदत करावी, अशी मागणी पुढे येत असताना राज्य सरकारने अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही.
संभाजीराजे सक्रिय
दरम्यान, परतीच्या पावसाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांचे अश्रू पुसण्याची भूमिका घेत संभाजीराजे यांनी दौरा काढण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार 17 ऑक्टोबला पंढरपूर (सोलापूर), 18 ऑक्टोबरला उस्मानाबादला, 19 ऑक्टोबरला लातूर आणि 20 ऑक्टोबरला बीड या जिल्ह्यात दौरा करून पाहणी करणार आहेत. तसेच शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी आणि त्यांच्या नुकसानीची माहिती राज्य सरकारला देवून त्यांना मदत मिळावी, या हेतूने हा दौरा नियोजित केला आहे.
-खासदार संभाजीराजे छत्रपती