मुंबई प्रतिनिधी
गेल्या आठवड्यापासून राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांनी राज्य सरकारमध्ये विलिनीकरणाच्या मागणीसाठी संप पुकारला आहे .महाराष्ट्राची जीवनवाहिनी म्हणून ओळखली जाणारी एसटी सेवा बंद असल्याने राज्यातील जनतेला याचा मोठा फटका बसला आहे. उच्च न्यायालयाने संप थांबविण्याचा आदेश दिलेला आहे, तर दुसरीकडे संपकरी कर्मचारी निलंबित करण्यात येत आहे.अखेर आज एसटी महामंडळाने एक निवेदन प्रसिद्ध करत एसटी कर्मचाऱ्यांना आंदोलन मागे घेण्याचे आवाहन केलं आहे.
कोरोना महामारीच्या संकटामुळे आपली लालपरी मोठ्या आर्थिक संकटात सापडली आहे. संप करून तिला पुन्हा आर्थिक गर्तेत लोटू नका. सध्या एसटीचा संचित तोटा १२००० कोटी रुपयांपर्यंत पोहचलेला आहे. असे असतांना देखील, सर्व कर्मचा-यांचे गेल्या १८ महिन्याचे वेतन एसटी महामंडळाने अदा केले आहे. त्यासाठी राज्य शासनाकडून आतापर्यंत ३५४९ कोटी रुपयांचा आर्थिक निधी प्राप्त झाला आहे. यापुढे देखील आपल्या सर्वांचे वेतन वेळेवर देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला जाईल, असे एसटी महामंडळाने या निवेदनात म्हटले आहे.
संपामुळे गेली कित्येक दिवस सर्व सामान्य प्रवाशी जनतेचे अतोनात हाल होत आहेत. या सर्वांचा विचार करुन आपण तातडीने संप मागे घ्यावा आणि सर्वसामान्य जनतेच्या सेवेत पुन्हा रुजु व्हावे हीच आपणांस विनंती, असल्याचे देखील या निवेदनात म्हंटल आहे.









