प्रवाशांची गैरसोय, खासगी वाहनांचा आधार
बेळगाव / प्रतिनिधी
केएसआरटीसीच्या कर्मचाऱयांना सरकारी नोकरीत सामावून घ्या, सरकारी नोकराप्रमाणे सोयी-सुविधा पुरवा, या मागण्यांसाठी शुक्रवारी परिवहनच्या कर्मचाऱयांनी काम बंद आंदोलन छेडले. बेंगळूरमध्ये परिवहनच्या कर्मचाऱयांनी पुकारलेल्या संपाला प्रतिसाद देत बेळगाव आगारातही काम बंद आंदोलन छेडण्यात आले. या बंदमुळे लांब पल्ल्यासह स्थानिक बस बसस्थानकात अडकून पडल्याने आलेल्या प्रवाशांची गैरसोय झाली. परिवहनच्या कर्मचाऱयांनी पुकारलेल्या संपामुळे प्रवाशांना मात्र फटका बसला. दरम्यान, विविध मागण्यांसाठी परिवहनच्या कर्मचाऱयांनी शुक्रवारी छेडलेले आंदोलन रात्री उशीरापर्यंत सुरुच होते. त्यामुळे शनिवारी देखील बस बंद राहण्याची शक्यता आहे.
सर्व निगम-महामंडळामध्ये 1 लाख 20 हजार कर्मचारी काम करतात. कर्मचारी 24 तास सेवा देत असतात मात्र त्यांना अत्यंत कमी वेतनावर काम करावे लागत आहे. त्यामुळे दैनंदिन जीवन जगताना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. त्यामुळे आम्हाला सरकारी नोकराचा दर्जा देऊन सरकारी सोयी-सुविधा पुरवाव्यात, अशी मागणी करत कर्मचाऱयांनी बसस्थानकाच्या प्रवेशव्दारातच आंदोलन छेडले.
केएसआरटीसीच्या कर्मचाऱयांनी शुक्रवारी सकाळी कोणतीही पूर्वसूचना न देता स्वयंस्फूर्तीने अचानक संप पुकारल्याने बेळगाव आगारातील सर्व प्रकारच्या बस जाग्यावर थांबून होत्या. परिणामी हजारो प्रवासी बसस्थानकात अडकून पडले. काही वेळेनंतर प्रवाशांनी इच्छीतस्थळी पोहोचण्यासाठी खासगी वाहनांचा आधार घेतला. तर काही लहान बालकांसह वृद्ध प्रवासी बसून होते. त्यामुळे प्रवाशांचे हाल झाले. याबरोबरच येथील राणी चन्नम्मा विद्यापीठात परीक्षा सुरू असल्याने परीक्षा देणाऱया विद्यार्थ्यांची गैरसोय झाली. सकाळपासून बससेवा बंद राहिल्याने विद्यार्थ्यांना खासगी वाहनांद्वारे परीक्षा केंद्र गाठावे लागले. सकाळी बसस्थानकात महाराष्ट्रातून दाखल झालेल्या महाराष्ट्र परिवहन मंडळाच्या बसेस देखील बसस्थानकात थांबून होत्या. त्यामुळे महाराष्ट्रातून आलेल्या प्रवाशांसह गोवा राज्यातील प्रवाशांनाही बस बंदचा फटका बसला. बसस्थानकात अनेक वृद्ध प्रवासी, दवाखान्यांसाठी आलेले रुग्ण प्रवासी ताटकळत थांबले होते. त्यामुळे वयोवृद्ध प्रवाशांनाही नाहक त्रास सहन करावा लागला. बसस्थानकातून दररोज 620 हून अधिक बस विविध मार्गावर धावतात. पण बंदमुळे सर्व प्रकारच्या बस बंद राहिल्याने शहराकडे येणाऱया प्रवाशांची गैरसोय झाली. परिणामी प्रवाशांना खासगी व इतर मिळेल त्या वाहनाने शहर गाठावे लागले. बससेवा ठप्प झाल्याने काही प्रवाशांनी बसस्थानकातच विसावा घेतला. अचानक पुकारलेल्या संपामुळे प्रवाशांची चांगलीच दमछाक झाली. बसस्थानकातून दररोज धावणारी वातानुकूलित बससेवा देखील ठप्प झाल्याने लांब पल्ल्याचा प्रवाशांची गैरसोय झाली. तर काहींनी आगाऊ तिकिट बुकिंग केल्याने प्रवाशांना आर्थिक फटका बसला.