वृत्तसंस्था/ जेरूसलेम
वेस्ट बँकेच्या उर्वरित भागांनाही इस्रायलमध्ये सामील करणार असल्याची घोषणा पंतप्रधान बेंजामीन नेतान्याहू यांनी केली आहे. परंतु त्यांच्या या निर्णयाला सरकारमध्ये सामील अन्य पक्ष विरोध करत आहेत. तर पूर्ण वेस्ट बँकेवर आपला अधिकार असल्याचे पॅलेस्टिनी लोकांचे मानणे आहे. पॅलेस्टाईनचे लोक या क्षेत्राला स्वतःच्या भविष्यातील स्वतंत्र देशाचा सर्वात महत्त्वपूर्ण भाग मानतात. या क्षेत्राच्या मोठय़ा भूभागावर कब्जा करून ‘दोन देश’ संबंधित तोडगा कायमस्वरुपी निकालात निघणार आहे.
इस्रायलकडे मध्यपूर्वेचा नकाशा पुन्हा तयार करण्याची ऐतिहासिक संधी असून ती गमावली जाऊ नये. जुलैमध्ये यासंबंधी पाऊल उचलणार असल्याचे नेतान्याहू यांनी म्हटले आहे. या निर्णयाकरता नेतान्याहू यांनी अप्रत्यक्षपणे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाशी असलेल्या मैत्रिपूर्ण संबंधांचा दाखला दिला आहे.
अरब, युरोपशी वाढणार मतभेद
वेस्ट बँकेवर कब्जा करण्याची याहून मोठी ऐतिहासिक संधी इस्रायलच्या 1948 मधील स्थापनेपासून मिळाली नव्हती, असे नेतान्याहू यांनी म्हटले आहे. परंतु नेतान्याहू यांच्या या टिप्पणीमुळे अरब आणि युरोपीय सहकाऱयांसोबत इस्रायलचे मतभेद वाढू शकतात. अमेरिकेतही इस्रायलसंबंधी राजकीय पक्षांमधील वाद अधिक चिघळू शकतो. इस्रायलने 1967 च्या युद्धात वेस्ट बँकेवर कब्जा करत तेथे सुमारे 5 लाख ज्यू धर्मीयांना वसविले होते. परंतु आंतरराष्ट्रीय विरोधामुळे इस्रायलने कधीच औपचारिक स्वरुपात याला स्वतःची भूमी घोषित केले नव्हते. परंतु अमेरिकेच्या माजी अध्यक्षांच्या तुलनेत ट्रम्प यांची भूमिका यासंबंधी अत्यंत मवाळ राहिली आहे.









