आयसीएमआरचे प्रतिपादन : काही जणांना लस देऊन कोरोना रोखता येणार
वृत्तसंस्था /नवी दिल्ली
लसीकरणाचे यश लसीच्या प्रभावोत्पादकतेवर अवलंबून आहे. कोरोनाच्या संसर्गाची साखळी तोडणे हा आमचा उद्देश आहे. काही लोकांना लस देऊन कोरोना संक्रमण रोखण्यास यश मिळाले तर पूर्ण लोकसंख्येला लस देण्याची गरज भासणार नसल्याचे उद्गार आयसीएमआरचे महासंचलक डॉ. बलराम भार्गव यांनी मंगळवारी काढले आहेत.
आरोग्य सचिव राजेश भूषण यांनीही यासंबंधी टिप्पणी केली आहे. सरकारने कधीच सर्व लोकांना लस देणार असल्याचे म्हटलेले नाही. अशाप्रकारच्या वैज्ञानिक बाबींसंबंधी तथ्यात्मक विधाने करणे आवश्यक असल्याचे भूषण म्हणाले. केंद्र सरकारने ऑक्सफोर्ड लसीच्या चाचणीत भाग घेणाऱया तामिळनाडूच्या एका व्यक्तीवर कथित दुष्परिणामामुळे लसीची टाईमलाईन प्रभावित होण्याची भीती फेटाळून लावली आहे.
सीरम इन्स्टीटय़ूटकडून निर्माण होणाऱया ‘कोविशील्ड’ लसीसंबंधीच्या वादावरही आरोग्य मंत्रालयाने स्वतःची भूमिका स्पष्ट केली आहे. अशाप्रकारच्या प्रकरणांची चौकशी ड्रग कंट्रोलर ऑफ इंडिया (डीसीजीआय) करते. कुठल्याही लसीच्या चाचणीपूर्वी स्वयंसेवकाची मंजुरी घेतली जाते. संबंधिताकडून रितसर अर्ज भरून घेतला जाते. चाचणीदरम्यान विपरित प्रभावही पडू शकतो असे त्यात स्पष्टपणे नमूद असते. कुठल्या आणि कशाप्रकारचे प्रभाव होतील याचाही अर्जात उल्लेख असतो. अर्ज वाचल्यावरच लोक चाचणीला मंजुरी देत असल्याचे आरोग्य सचिवांनी म्हटले आहे.
चाचणीदरम्यान रुग्णालयात एथिक्स कमिटी असते. ही समिती लसीच्या विपरित प्रभावावर देखरेख ठेवते. अशा कुठल्याही प्रकारच्या प्रभावाची माहिती मिळाल्यास समिती 30 दिवसांमध्ये याची कल्पना ड्रग कंट्रोलर ऑफ इंडियाला देते. याप्रकरणी पुढील चौकशी डीजीसीआय करत असल्याचे आरोग्य सचिवांनी सांगितले आहे.
लसीच्या दुष्परिणामाची जबाबदारी नियामकाची असते. नियामक याचा डाटा प्राप्त करून इवेंट आणि इंटरवेंशनमध्ये संबंध आहे का याचा शोध घेत असतो. म्हणजेच लस आणि स्वयंसेवकावर पडणाऱया प्रभावामध्ये संबंध आहे का हे पाहण्यात येते अशी माहिती आयसीएमआरचे महासंचालक डॉ. भार्गव यांनी दिली आहे.
लसविषयक वादावर सरकारची भूमिका
-क्लीनिकल ट्रायल बहुकेंद्रीत असते. याचा अर्थ केवळ एका ठिकाणी नव्हे तर अनेक ठिकाणी चाचण्या होत असतात.
-चाचणीदरम्यान लसीच्या दुष्परिणामावर नजर ठेवणारी एथिक्स टीम सरकार किंवा कुठल्याही कंपनीची नसते. चाचणी होत असलेल्या रुग्णालयाचे हे पथक असते.









