पुणे : देशात संपूर्ण लोकसंख्येचे लसीकरण होण्यासाठी दोन ते तीन वर्षे वाट पहावी लागणार असल्याचे सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे सीईओ अदर पुनावाला यांनी म्हटले आहे.
पूनावाला यांनी ट्विटच्या माध्यमातून लसीकरण मोहिमेविषयी मत व्यक्त केले आहे. लोकसंख्येच्या स्तरावर जगात आपल्या देशाचा दुसरा क्रमांक लागतो. एवढ्या मोठ्या लोकसंख्येच्या देशात लसीकरण मोहीम दोन-तीन महिन्यांत शक्य नाही. त्यामध्ये अनेक मुद्दे आणि आव्हानांचा समावेश असल्याने संपूर्ण लोकसंख्येचे लसीकरण होण्यासाठी दोन ते तीन वर्षे वाट पहावी लागू शकते.
महामारीत देशात लशींचा पुरेसा साठा नसल्याने टीकेची झोड उठत असताना पूनावाला यांनी हा खुलासा केला आहे. सीरमकडून देशाला प्राधान्य दिले जात आहे. लोकांच्या जीवाची किंमत चुकवून आम्ही लस कधीही निर्यात केली नाही, याचा आम्हाला पुनरुच्चार करायला आवडेल. तसेच देशातील लसीकरण मोहिमेला सर्व पद्धतीने मदत करण्याकरिता आम्ही कटिबद्ध आहोत.








