बत्ती गुल झाल्याने जागतिक स्तरावर इम्रान खान सरकारची नाचक्की
कराची / वृत्तसंस्था
पाकिस्तानमधील अनेक मोठय़ा शहरांमध्ये शनिवारी मध्यरात्रीनंतर अचानक ब्लॅकआऊट झाला. वीज वितरण व्यवस्थेत बिघाड झाल्यामुळे कराची, इस्लामाबाद, लाहोर, पेशावर, मुलतान आणि रावळपिंडीसह अनेक महत्त्वाची शहरे अंधारात बुडाली. तसेच देशातील बहुतांश भागात विजेअभावी काळोख दाटला. रविवारी दिवसभर दुरुस्तीचे काम हाती घेतल्यानंतर वीजपुरवठा पूर्ववत झाला असला तरी या प्रकारामुळे जागतिक पातळीवर इम्रान खान यांच्या नेतृत्त्वाखालील सरकारची नाचक्की झाली आहे. यापूर्वी जानेवारी 2015 मध्ये पाकिस्तानात ब्लॅकआऊट झाल्यानंतर बऱयाच शहरांमध्ये अनेक तास वीज गायब झाली होती. त्यानंतर 2018 मध्येही दोनवेळा पाकिस्तानात पॉवर ब्लॅकआऊट झाला होता.
या ब्लॅकआऊटच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानच्या ऊर्जा मंत्रालयाने ट्विटरवर एक निवेदन प्रसिद्ध केले. त्यानुसार सिंध प्रांतातील गुड्डू पॉवर प्लान्टमध्ये रात्री 11.41 वाजता बिघाड झाल्याचे समोर आले आहे. नॅशनल ट्रान्समिशन कंपनीच्या वीजवाहिन्या खराब झाल्यामुळे ब्लॅकआऊट झाल्याचे ट्विट इस्लामाबादचे उपायुक्त हमजा शफाकत यांनी केले आहे. तर, सर्व वीजपुरवठा पूर्ववत होण्यासाठी थोडा वेळ लागणार असल्याने लोकांनी संयम राखावा, असे आवाहन वीजमंत्री ओमर अयूब खान यांनी केले आहे. सकाळी इस्लामाबाद इलेक्ट्रिक सप्लाई कंपनीच्या ग्रीडची वीज सुरू करण्यात आली. त्यानंतर दुपारी बहुतांश भागातील वीजपुरवठा सुरळीत झाला होता.
सोशल मीडियावर ‘वीज’ कडाडली
पाकिस्तानमध्ये वीज खंडित झाल्याची बातमी पसरताच ब्लॉकआऊट ट्विटरवर टेंड करु लागला. तसेच सोशल मीडियावरही सरकारविरोधात ‘वीज’ कडाडली. यावेळी लोकांनी पाकिस्तानची खिल्ली उडविली. संपूर्ण पाकिस्तानात वीज गेल्याचे वृत्त वाऱयासारखे जगभरात पसरले. कोणी या घटनेला भारतीय वायू सेनेने केलेला हल्ला म्हणत होते, तर कोणी याला सायबर हल्ला असे संबोधताना दिसत होते.









