प्रतिनिधी / कोल्हापूर
महाविकास आघाडी सराकारने कर्जमाफीची निव्वळ घोषणा केली आहे. यातून एकाही शेतकऱयाचे समाधान होणार नाही. पात्र शेतकरीही लाभापासून वंचित राहणार आहेत. कोणतीही अट, निकष न लावता सरसकट आणि संपूर्ण कर्जमुक्ती चे सरकारने दिलेले आश्वासन पाळावे, याकडे लक्ष वेधण्यासाठी 28 जानेवारीस जिल्हाधिकारी कार्यालयावर प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱयांचा विराट मोर्चा काढण्यात येणार आहे. अशी माहिती भाजपचे जिल्हाध्यक्ष समरजीत घाटगे यांनी गुरुवारी पत्रकार बैठकीत दिली.
यावेळी भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष धनंजय महाडिक, प्रदेश सरचिटणीस सुरेश हाळवणकर, माजी आमदार अमल महाडिक, बाबा देसाई, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती अध्यक्ष महेश जाधव, जिल्हा परिषद सदस्य राहुल आवाडे, राहूल चिक्कोडे आदी उपस्थित होते.
समरजीत घाटगे म्हणाले, कर्जमाफीही सरसकटच मिळाली पाहिजी या भूमिकेवर आम्ही ठाम आहोत. महायुतीच्या सरकारने दिलेल्या कर्जमाफीमुळे बहुतांशी शेतकरी नियमित कर्जदार झालेले आहेत. ऊस बिलातून्ह पीक कर्ज जमा होते. तर नवे-जुने करण्याच्या पद्धतीमुळे नगन्य खाती थकबाकीत आहेत. त्यामुळे प्रामाणिक, नियमित भरणारे शेतकरी वंचित राहणार आहेत. त्यांनाही लाभ मिळण्यासाठी सरकट कर्जमाफी झाली पाहिजे सरकार स्थापन करण्याच्या प्रक्रिये दरम्यान शेतकऱयांच्या बांधावर जावून या पक्षांनी कर्जमुक्तीचे आश्वासन दिले ते पाळावे इतकच मागणी घेवून आम्ही आंदोलन हातात घेतले आहे. असे सांगत त्यांनी हे आंदोलन पक्षविरहीत असेल. शेतकऱयांनी ज्या संघटना या आंदोलन सहभागी होतील त्यांचे स्वागत आहे. स्वाभिमानीचे अध्यक्ष राजू शेट्टी, आमदार विनय कोरे, प्रकाश आवाडे यांनाही आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. मंगळवार 28 रोजी सकाळी 9 वाजता दसरा चौक येथून मोर्चास सुरवात होईल. या मोर्चात 20 हजार शेतकरी सहभागी होतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.









