केएसआरटीसीचा परिवहन कर्मचाऱयांना इशारा
प्रतिनिधी / बेंगळूर
राज्य रस्ते परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱयांनी विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी 7 एप्रिलपासून बेमुदत संपावर जाण्याचा इशारा राज्य सरकारला दिला आहे. संपावर गेलेल्या दिवसापासून अवैधपणे कामावर गैरहजर राहिल्याचे गृहित धरून संपावर जाणाऱया कर्मचाऱयांचे वेतन कपात करण्यात येईल, असा इशारा केएसआरटीसीने दिला आहे.
परिवहन निगम आवश्यक सेवा कायदा-2013 अंतर्गत येत असल्याने राज्य सरकारच्या अधिसूचनेनुसार परिवहनमधील कर्मचाऱयांना संपावर जाण्यास मनाई आहे. त्यामुळे कर्मचाऱयांनी संप पुकारू नये, असे केएसआरटीसीचे व्यवस्थापकीय संचालक शिवयोगी कळसद यांनी आवाहन केले आहे.
परिवहन कर्मचाऱयांच्या 9 पैकी 8 मागण्या मान्य केल्याचे सरकार सांगत आहे. तरीदेखील प्रत्यक्षात जुन्या आदेशांमध्ये किरकोळ बदल करून पक्षपातीपणे आदेश जारी करण्यात आले आहे. त्यामुळे परिवहन कर्मचाऱयांना अनुकूलतेपेक्षा प्रतिकुल परिस्थितीलाच अधिक सामोरे जावे लागणार आहे. त्यामुळे 7 एप्रिलपासून बेमुदत संपावर जाण्याचा निर्णय परिवहन कर्मचाऱयांनी घेतला आहे, अशी माहिती राज्य रस्ते परिवहन कर्मचारी संघटनेचे मानद अध्यक्ष कोडिहळ्ळी चंद्रशेखर यांनी दिली आहे.









