वृत्तसंस्था / नवी दिल्ली
कामगार संघटनांनी पुकारलेल्या देशव्यापी संपात काही बँक कर्मचारी संघटना सहभागी झाल्याने गुरुवारी बँकिंग सेवेवर काही प्रमाणात प्रभाव पडला आहे. बँकेत पैसे जमा करणे तसेच काढण्याचे काम अनेक सरकारी बँकांमध्ये रखडल्याचे वृत्त आहे. मात्र देशातील सर्वात मोठी बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडिया आणि खासगी बँकांचे कामकाज सुरूच राहिल्याने संपाचा मोठा प्रभाव जाणवलेला नाही.
ऑल इंडिया बँक इम्पॉलयीज असोसिएशन (एआयबीईए), ऑल इंडिया बँक ऑफिसर्स असोसिएशन (एआयबीओए) आणि बँक एम्पॉलयीज फेडरेशन ऑफ इंडिया (बीईएफआय) या संघटनांनी या भारतबंदमध्ये भाग घेतला होता. केंद्र सरकारच्या धोरणांच्या विरोधात हा संप पुकारण्यात आला होता. तामिळनाडू आणि केरळमध्ये या संपाचा सर्वाधिक प्रभाव जाणवल्याचे कामगार संघटनांच्या प्रतिनिधींनी म्हटले आहे.
10000 बँक शाखांमधील सुमारे 30000 कर्मचाऱयांनी संपमध्ये भाग घेतल्याचा दावा एआयबीईएने केला आहे. एआयबीई ही संघटना स्टेट बँक आणि इंडियन ओव्हरसीज बँक वगळता उर्वरित बँककर्मचाऱयांचे प्रतिनिधित्व करते. बँकांचे खासगीकरण आणि कंत्राटी पद्धतीच्या विरोधात बँक कर्मचारी संप करत होते.
इंडियन नॅशनल ट्रेड युनियन काँग्रेस, ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेसन, हिंद मजदूर सभा, सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन्स, ऑल इंडिया युनायटेड ट्रेड युनियन सेंटर, ट्रेड युनियन को-ऑर्डिनेशन सेंटर आणि सेल्फ इम्प्लॉईड वुमन्स असोसिएशन या संघटनांनी या संपात भाग घेतला आहे.









