खेडय़ामधील रूढीवादी कुटुंबांमध्ये मुलींच्या वाटय़ाला नेहमीच निर्बंध आणि सल्ले अधिक येतात. मध्य प्रदेशातील सतना जिल्ह्याच्या अमदरा गावात जन्माला आलेल्या सुरभी गौतम यांना मात्र आईवडिलांकडून शिक्षणासाठी चांगले प्रोत्साहन मिळाले, कारण वकील असणारे वडील आणि शिक्षिका आई या दोघांनाही शिक्षणाचे महत्त्व चांगलेच माहीत होते.
- गावातील इतर मुलांप्रमाणेच सरकारी शाळेत सुरभी यांनी प्रवेश घेतला. ते हिंदी माध्यमाचे विद्यालय होते. सुरभी यांनी पहिल्यापासूनच अभ्यासात चांगली प्रगती दाखविली; परंतु कुटुंबीयांच्या दृष्टीने ती काही फार मोठी गोष्ट नव्हती. मध्य प्रदेशात पाचवीलासुद्धा बोर्डाची परीक्षा असे. या परीक्षेचा निकाल आल्यावर शिक्षकांनी सुरभी यांना घरी बोलावले आणि शाबासकी देऊन सांगितले की, गणितात तिने शंभरपैकी शंभर मार्क मिळवले आहेत. शिक्षकांनी त्या वेळेपर्यंत तरी कुणालाच शंभर टक्के मार्क मिळवताना पाहिलेले नव्हते. ‘तू पुढे खूप मोठी होशील,’ हे शिक्षकांचे शब्द सुरभी यांच्यासाठी खूप मोलाचे ठरले.
- तेव्हापासून सुरभी यांनी अधिक गांभीर्याने अभ्यास करायला सुरुवात केली. या काळात सुरभी यांना सांधेदुखीचा त्रास वारंवार होऊ लागला. डॉक्टरांनी ‘रूमॅटिक फीवर’ असे सुरभी यांच्या आजाराचे निदान केले. या आजारामुळे हृदयाचे नुकसान होते आणि काही रुग्णांचा मृत्यूही होऊ शकतो, असे डॉक्टरांनी सांगितल्यानंतर आईवडील घाबरून गेले. प्रत्येक पंधरवडय़ात पेनिसिलिनचे एक इंजेक्शन घेण्याचा सल्ला सुरभी यांना देण्यात आला. पण यासाठी गावात तर कुशल डॉक्टरही नव्हते. त्यामुळे दर पंधरा दिवसांनी सुरभी यांना जबलपूरला जावे लागत असे. परंतु आजाराने ग्रस्त असणार्या सुरभी यांनी अभ्यासात खंड पडू दिला नाही.
- दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेत त्यांना केवळ गणितातच नव्हे तर विज्ञानातसुद्धा शंभरपैकी शंभर मार्क मिळाले. राज्यातील प्रतिभावंत विद्यार्थ्यांच्या यादीत नाव झळकले. सुरभीला कलेक्टर बनायचे होते, पण यासाठी काय करायचे असते, हे ठाऊक नव्हते.
- ङबारावीला विज्ञानात सर्वाधिक गुण मिळाल्यामुळे त्यांना एपीजे अब्दुल कलाम शिष्यवृत्ती मिळाली. अभियांत्रिकीची प्रवेश परीक्षाही त्या उत्तीर्ण झाल्या आणि भोपाळच्या अभियांत्रिकी महाविद्यालयात दाखल झाल्या. इलेक्ट्रॉनिक अँड कम्युनिकेशन या विषयात त्यांना प्रवेश मिळाला होता. त्यांच्या गावातून उच्च शिक्षणासाठी बाहेर पडलेली पहिलीच मुलगी ठरण्याचा मान त्यांना मिळाला.
- महाविद्यालयातील पहिल्याच दिवशी जेव्हा फर्डा इंग्रजीत विद्यार्थी आपली ओळख करून देत होते, तेव्हा मात्र सुरभी यांचा चेहरा कोमेजला. कारण त्यांना इंग्रजी बोलायला अजिबात येत नव्हते. कशीबशी तिने स्वतःची ओळख करून दिली. परंतु त्याच वेळी प्राध्यापकांनी भौतिकशास्त्रातील एक प्रश्न त्यांना इंग्रजीतून विचारला. सुरभी गप्प उभ्या राहिल्या. अगदी सामान्य प्रश्नाचे उत्तरही येत नसल्यामुळे प्राध्यापक म्हणाले, ‘तू खरोखर बारावी उत्तीर्ण होऊन आली आहेस का?’ परंतु प्रश्न भौतिकशास्त्राचा नसून इंग्रजी भाषेचा होता.
- या प्रसंगानंतर वसतिगृहातील आपल्या खोलीत सुरभी खूप रडल्या. नंतर आईवडिलांना फोन करून घरी परतण्याची इच्छा व्यक्त केली. वडील म्हणाले, “तू घरी येऊ शकतेस; परंतु तुझ्या अशा करण्याने गावातील अन्य मुलींचा शिक्षणासाठी गावाबाहेर जाण्याचा मार्ग कायमचा बंद होईल.” ही बाब सुरभी यांना चांगलीच टोचली. पहिले सेमिस्टर पूर्ण होण्याच्या आत आपण ओघवत्या इंग्रजीत बोलून दाखवायचेच, असा पण त्यांनी केला. पहिल्या सेमिस्टरमध्ये त्या केवळ महाविद्यालयातच नव्हे तर विद्यापीठात पहिल्या क्रमांकाने उत्तीर्ण झाल्या. ङ वीस वर्षांच्या असताना त्यांनी अभियांत्रिकीची पदवी प्राप्त केली. त्यानंतर त्यांनी जेवढय़ा स्पर्धा परीक्षा दिल्या, त्या सर्व परीक्षांमध्ये त्यांची निवड झाली. आयईएस परीक्षेत देशातील पहिल्या महिला टॉपर ठरलेल्या सुरभी गौतम यांची भारतीय रेल्वेमध्ये निवड झाली. कोणतीही गोष्ट मनात आणली तर आपण ती मिळवू शकतो, असा त्यांचा तमाम मुलींना संदेश आहे.