वृत्त संस्था/ बेलग्रेड
सर्बियात सुरू असलेल्या एआयबीए पुरूषांच्या विश्व मुष्टियुद्ध स्पर्धेत भारताच्या संजित, निशांत देव, आकाशकुमार, नरेंद्र यांनी आपल्या वजन गटात उपांत्यपूर्व फेरीत स्थान मिळविले.
पुरूषांच्या 71 किलो वजनगटातील रविवारी झालेल्या लढतीत भारताच्या निशांत देवने मेक्सिकोच्या व्हेर्डीचा 3-2 अशा गुणांनी पराभव करत शेवटच्या आठ स्पर्धकांमध्ये स्थान मिळविले. निशांतचा पुढील फेरीतील सामना रशियाच्या मुसायेव्हविरुद्ध होणार आहे. दुसऱया एका लढतीत भारताच्या संजितने जॉर्जियाच्या चिग्लेजचा 4-1 अशा गुणांनी पराभव करत उपांत्यपूर्व फेरी गाठली. संजितचा पुढील फेरीतील सामना इटलीच्या मोहीदिनीशी होईल.
54 किलो वजनगटात भारताच्या आकाशकुमारने प्युर्तो रिकोच्या टिराडोव्हवर 5-0 अशा गुणांनी विजय मिळवत उपांत्यपूर्व फेरीत स्थान मिळविले. 92 किलोवरील वजन गटात भारताच्या नरेंद्रने उपांत्यपूर्व फेरीत स्थान मिळविले. या स्पर्धेसाठी भारतीय पथकात 13 मुष्टियोद्धय़ांचा समावेश आहे.









