वृत्तसंस्था/ बेंगळूर
भारताचे माजी फलंदाज संजय बांगर यांची रॉयल चॅलेंजर्स बेंगळूर या आयपीएलमधील प्रँचायजीने संघाच्या फलंदाज सल्लागारपदी नियुक्ती केली असल्याचे बुधवारी जाहीर केले.
संजय बांगर यांनी 2014 पासून राष्ट्रीय संघाचे फलंदाज प्रशिक्षकपद सांभाळले होते. 2019 मधील विश्वचषक स्पर्धेपर्यंत त्यांच्याकडे ही जबाबदारी होती. त्यानंतर त्यांच्या जागी विक्रम राठोड यांची नियुक्ती करण्यात आली. ‘आरसीबी फॅमिलीत फलंदाज सल्लागार या नात्याने संजय बांगर यांचे स्वागत करताना आम्हाला अत्यानंद होत आहे. आमच्या संघात तुमचे स्वागत असो,’ असे आरसीबीने ट्विट केले आहे. 48 वर्षीय बांगर यांनी 2001 ते 2004 या कालावधीत भारतातर्फे 12 कसोटी व 15 वनडे सामने खेळले आहेत. आरसीबीचे नेतृत्व विराट कोहलीकडे असल्याने आयपीएलमध्ये कोहली-बांगर ही युती पुन्हा एकदा एकत्र दिसणार आहे.









