प्रतिनिधी / वाळपई
सरकारने रविवारपासून कडक संचारबंदी करण्याचे निर्देश दिले असतानाही होंडा भागामध्ये आठवडय़ाच्या बाजार मात्र काल रविवारी भरला. या बाजारामध्ये खरेदी करण्यासाठी नागरिकांनी मोठय़ा प्रमाणात गर्दी केली होती. याचे फोटो व्हायरल झाल्यानंतर सर्वत्र संतापाची लाट पसरली आहे. पोलिसांनी मात्र कारवाई केली नाही.
होंडा भागामध्ये कोवीड रुग्णांची संख्या वाढत असताना असा मूर्खपणा करणे कितपत योग्य असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे. या आठवडी बाजारामध्ये सहभागी होणाऱया विपेत्यावर सरकारशी संबंधित यंत्रणा खरोखर कारवाई करणार का असा सवाल आता नागरिकांकडून उपस्थित होताना दिसत आहे.
सरकारने संचारबंदी लागू करण्याच्या दृष्टिकोनातून दिलेल्या निर्देशानुसार पंचायत व नगरपालिकेच्या बाजारावर पूर्णपणे बंदी घालण्यात आलेली आहे. असे असतानाही आज रविवारी होंडा या ठिकाणी बाजार भरला.
हा भाग होंडा पोलीस चौकी पासून थोडय़ाच अंतरावर असताना व होंडा भागाच्या तिठय़ावर सातत्याने पोलीस पहारा असताना अशा प्रकारची गर्दी पोलिसांनी बंद करणे गरजेचे होते. त्याचबरोबर अशा विपेत्यांवर कारवाई करण्याची गरज होती. मात्र तसे न झाल्यमुळे दुपारी उशिरापर्यंत नागरिकांनी भाजी खरेदी करण्यासाठी लोकांची गर्दी केल्याचे चित्र पहावयास मिळाले . प्रमुख रस्त्याच्या शेजारीच बाजार भरत असतो .सरकारचे मोठमोठे अधिकारी याच रस्त्यावरून ये-जा करत असतात .सदर ठिकाणी बाजार भरला असताना त्यांच्यावर कारवाई न केल्यामुळे नागरिकांनी तीव्र स्वरूपाची चिंता व्यक्त केली आहे. महत्त्वाचे म्हणजे होंडा पंचायतीच्या पंच सभासदांनी सुद्धा या संदर्भात अजिबात आक्षेप घेतलेला नाही .त्याचप्रमाणे स्वतःला समाजसेवक म्हणून समजत असलेल्या नागरिकांनी सुद्धा पुढाकार घेत हा बाजार बंद करण्याचे धाडस न दाखविणे हे खरोखरच दुर्दैवी स्वरूपाचे असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.









