प्रतिनिधी/कडेगाव खेराडे वांगी येथील मुंबई येथे मयत झालेल्या एका व्यक्तीचा कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आल्यानंतर जिह्यात खळबळ उडाली. या घटनेनंतर अनेक प्रश्नांना तोंड फुटले असून संचारबंदी असताना मृतदेह कोणाच्या परवानगीने मुंबई येथून खेराडे वांगी येथे आणला. यासह महत्वपूर्ण सवाल करत माजी जिल्हापरिषद अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांनी याची चौकशी व्हावी. आणि दोषींवर कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. संग्रामसिंह देशमुख यांनी याबाबतचे निवेदन प्रांताधिकारी गणेश मरकड यांना दिले. निवेदनात दिलेली माहिती अशी की, 18 रोजी सायन हॉस्पिटल मुंबई येथे एका व्यक्तीचा मृत्यू झाला. मृत्यूचे कारण हृदयविकाराच्या झटक्याने झाल्याचे मुंबई येथील सायन हॉस्पिटल प्रशासनाने मृत्यू प्रमाण पत्रात नमुद केले आहे. तथापि मृत पावलेल्या व्यक्तीचे स्वॅबचे नमुने घेतले होते. वास्तविक मृत्यू प्रमाणापत्रावर कोरोना संशयित व्यक्ती अथवा कोरोना रिपोर्ट पेंडीग असा उल्लेख करायला हवा होता. मात्र, तसे न झाल्यामुळे त्याच व्यक्तीचे अंत्यसंस्कार खेराडे वांगी येथे करण्यात आले. यानंतर 22 रोजी सदरची व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह असल्याचा अहवाल हॉस्पिटल प्रशासनाने जिल्हा प्रशासनाला कळविला. यावर आक्षेप घेत संग्रामसिंह देशमुख यांनी प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे या निवेदनात म्हटले आहे की, प्रोटोकॉल नुसार मृत व्यक्तीचे स्वॅबचे घेण्यात आले होते. परंतु रिपोर्ट समजण्या आधी मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात का दिला. संचारबंदीमुळे मुंबई मध्ये अंत्यसंस्कार करणे आवश्यक असताना गावाकडे मृतदेह आणला कसा. ग्रामपंचायत खेराडे वांगी व ग्रामस्थांचा हा मृतदेह गावामध्ये आणण्यासाठी विरोध होता. तसेच जिल्हाबंदी असताना हा मृतदेह गावामध्ये आणला त्यावेळी स्थानिक प्रशासन काय करत होते. महाराष्ट्रात लॉकडाऊन असताना मुंबई, पुणे, सातारा व सांगली जिल्ह्य़ाच्या सिमा ओलांडून मृतदेह खेराडे वांगी गावात कसा आला. त्यासाठी कोणत्या सक्षम प्राधिकाऱयाने प्रवास परवाना दिला होता का? असल्यास त्यांनी जिल्हा अथवा स्थानिक प्रशासनास याबाबत सुचना दिली होती का. अंत्यसंस्कार करताना प्रोटोकॉल नुसार अंत्यसंस्कार करण्यात आले का. जमाव बंदी असताना पाच पेक्षा जास्त लोक एकत्र आले होते. याबाबत प्रशासनाने कोणतीही दक्षता का घेतली नाही. संपर्कात आलेल्या व्यक्तीचे अहवाल निगेटिव्ह आल्याचे समजते. परंतु संपूर्ण गामीण भागामध्ये लोक कटाक्षाने काळजी घेत असताना यामुळे संपूर्ण गाव आणि तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्यास हानी पोहोचली तर त्या गलथानपणाला जबाबदार कोण. तरी सदर प्रकरणामध्ये सर्व सामान्य नागरिकांच्या आरोग्यास हलगर्जीपणाने धोका निर्माण करणाऱया दोषींवर कठोर कारवाई व्हावी, असे या निवेदनात म्हटले आहे.
Previous Articleकाय आहे प्लाझ्मा थेरपी ?
Next Article उजनी जलवाहिनीला गळती, लाखो लिटर पाणी वाया








