नवी दिल्ली / वृत्तसंस्था
आगामी आयपीएल स्पर्धेतील 10 संघांची सर्वसाधारण फेररचना कशी असेल, याचे स्वरुप दोन दिवसांच्या मेगा ऑक्शननंतर स्पष्ट झाले आहे. प्रत्येक संघाचे ‘प्लेईंग इलेव्हन’ कसे असू शकते, हे देखील सुनिश्चित झाले आहे. आता मार्चच्या उत्तरार्धात या स्पर्धेचा बार केव्हा वाजेल, याची क्रिकेट चाहत्यांना आ वासून प्रतीक्षा असेल. या पार्श्वभूमीवर, सर्वही 10 प्रँचायझींचे स्वरुप कसे असू शकेल आणि त्यांच्यासमोरील आव्हाने काय असतील, याची ही थोडक्यात झलक!
1) चेन्नई सुपरकिंग्स: फलंदाजी भरभक्कम, गोलंदाजीही उत्तम!
संभाव्य प्लेईंग इलेव्हन ः ऋतुराज गायकवाड, डेव्हॉन कॉनवे, मोईन अली, रॉबिन उत्थप्पा/शिवम दुबे, अम्बाती रायुडू, रविंद्र जडेजा, महेंद्रसिंग धोनी, दीपक चहर, डेव्हॉन ब्रेव्हो, केएम असिफ/तुषार देशपांडे/राजवर्धन हंगरगेकर, ऍडम मिल्ने.
गतवर्षी ज्या टेम्प्लेटवर आयपीएल चॅम्पियनशिप जिंकली, तेच टेम्प्लेट चेन्नई सुपरकिंग्स यंदाही अंमलात आणत 2021 आयपीएल फायनल जिंकलेल्या 11 पैकी 8 खेळाडूंना एक तरी रिटेन केले आहे किंवा पुन्हा लिलावात त्यांना खरेदी केले आहे. चेन्नईची फलंदाजी अन्य कोणत्याही संघाच्या तुलनेत अधिक मजबूत भासते आणि गोलंदाजीतही त्यांच्याकडे उत्तम पर्याय उपलब्ध आहेत.
भक्कम फलंदाजीमुळे गोलंदाजीत स्पिन ऑप्शन आजमावण्याचीही त्यांच्याकडे अधिक मुभा असेल. चहल, ब्रेव्हो व मिल्ने क्लास परफॉर्मर ठरत आले आहेत. मात्र, या संघाला यंदा शार्दुल ठाकुरची उणीव जाणवू शकते. गायकवाड व कॉनवे यांच्यामुळे प्रतिस्पर्धी गोलंदाजीच्या चिंधडय़ा उडवण्याची क्षमता या संघाच्या फलंदाजी लाईनअपमध्ये आहे. या संघाचे पहिल्या पसंतीचे 6 खेळाडू 33 किंवा त्याहून अधिक वर्षे वयोगटातील आहेत!
2) दिल्ली कॅपिटल्स: फलंदाजी अव्वल, पण, प्रारंभी विकेट्स कोण घेणार?
संभाव्य प्लेईंग इलेव्हन ः पृथ्वी शॉ, डेव्हिड वॉर्नर, मिशेल मार्श, रिषभ पंत, रोव्हमन पॉवेल, सर्फराज खान/मनदीप सिंग, शार्दुल ठाकुर, अक्षर पटेल, कुलदीप यादव, ऍनरिच नोर्त्झे, चेतन साकरिया.
मागील 3 हंगामातील आपली मजबूत कोअर टीम गमावलेल्या दिल्लीला यंदा नव्याने सुरुवात करणे भाग होते. शिखर धवन व श्रेयस अय्यर या जुन्या सलामीवीरांना गमवावे लागल्यानंतर या संघाने वॉर्नर व मार्श यांना करारबद्ध केले. पण, हे दोन्ही खेळाडू विदेशी असल्याने आणि संघात केवळ 4 विदेशी खेळाडू खेळवण्याची अट असल्याने या संघाला मध्यफळीत अनुभव नसलेल्या भारतीय खेळाडूंनाही खेळवणे भाग असेल. पाचव्या क्रमांकावर रोव्हमन पॉवेल आणि गोलंदाजीत नोर्त्झे हे आणखी दोन विदेशी पर्याय या संघाकडे असणार आहेत. शार्दुल व अक्षर यांच्यामुळे दिल्लीच्या फलंदाजीत अधिक डेप्थ असेल.
गोलंदाजीच्या आघाडीवर विशेषतः पॉवर प्लेच्या षटकात नव्या चेंडूवर विकेट्स कोण घेणार, ही मात्र त्यांच्यासाठी चिंतेची बाब ठरु शकते. कुलदीप यादवचा खराब फॉर्म ही देखील त्यांची डोकेदुखी ठरु शकते. मिशेल मार्श सातत्याने दुखापतीने त्रस्त असतो. त्यामुळे, सहाव्या गोलंदाजाची गरज भासली तर पॉवेल हाच त्यांच्यासाठी एकमेव पर्याय असेल.









