प्रांताधिकारी कार्यालयासमोर लांबच लांब रांगा
प्रतिनिधी /बेळगाव
संगोळ्ळी रायण्णा सोसायटीच्या ठेवीदारांनी कागदपत्रे प्रांताधिकारी कार्यालयामध्ये जमा करावीत, असा आदेश देण्यात आला होता. त्यामुळे ठेवीदारांनी कागदपत्रे देण्यासाठी प्रांताधिकारी कार्यालयासमोर मोठी गर्दी केली होती. ठेवीदार संपूर्ण माहिती देत होते. यावेळी काहीसा गोंधळ उडाला होता.
संगोळ्ळी रायण्णा सोसायटीमध्ये ठेवलेल्या ठेवी परत मिळाल्या नाहीत. त्यामुळे ठेवीदारांनी तक्रारी केल्या होत्या. त्याचबरोबर या सोसायटीचे चेअरमन आनंद अप्पुगोळ यांच्यासह सर्व संचालकांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात आले. चेअरमनसह काही जणांना अटकही झाली. तरीदेखील सर्वसामान्य जनतेला रक्कम परत मिळाली नाही. यामुळे गोरगरीब जनता तणावाखाली आहे.
सहकारक्षेत्राने याबाबत गांभीर्याने घेतले. त्यानंतर आनंद अप्पुगोळ यांच्या काही मालमत्ता जप्त करण्याबाबत कारवाई केली आहे. त्यामुळे काहीसा दिलासा ठेवीदारांना मिळाला आहे. सध्या तरी ठेवीदारांकडून रकमेबाबतचा संपूर्ण अहवाल, तसेच ठेवीदारांची माहिती जमा करून घेण्यात येत आहे. प्रांताधिकारी कार्यालयामध्ये प्रत्येकाचे नाव नोंदवून घेऊन कागदपत्रे जमा केली गेली आहेत.
सोमवारी ही कागदपत्रे देण्यासाठी प्रांताधिकारी कार्यालयासमोर मोठी झुंबड उडाली होती. महिलांसह वृद्धांनीदेखील लांबच लांब रांगा लावल्या होत्या. दिवसभर घाम गाळून पैसा जमा करायचा, तो पैसा भविष्यासाठी ठेवायचा, मात्र तो देण्यास टाळाटाळ करणे तसेच बुडविण्याचा प्रयत्न करणे यामुळे जनता अक्षरशः मेटाकुटीस आली आहे. यावेळी अनेकांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.









