अतुल भोसले / इचलकरंजी
महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक कार्य संचलनालय मुंबई यांनी आयोजित केलेल्या ५९व्या मराठी संगीत नाट्यस्पर्धा इचलकरंजीतील श्रीमंत घोरपडे नाट्यगृहात होत आहेत. या स्पर्धेतील पंधरावे नाटक”संगीत ताजमहाल” हे या स्पर्धेसाठी लिहलेले ,खल्वायन रत्नागिरी या नाट्य संघाने मोठ्या ताकतीने सादर केले.
समाजाचं किंवा समाजात घडणाऱ्या छोट्या-मोठ्या घटनांच तसेच इतिहासातील घडलेल्या गोष्टींचं प्रतिबिंब साहित्यातील, कलाकृतीतून पडलं पाहिजे अशी अपेक्षा असते आणि ती रास्तही असते,कांही वेळा स्पष्टपणे किंवा आधार घेऊन किंवा पुसट संदर्भ किंवा पार्श्वभूमी घेऊन अनेक कलाकृती- म्हणजे नाटक,चित्रपट,कादंबरी, कथा,कविता आकाराला येतानां किंवा सादर होतानां आपण बघतो.आपल्याला माहिती असलेल्या गोष्टी किंवा संदर्भ त्यातून प्रकट झाल्याने त्या कलाकृतीशी आपली थोडीफार जवळीकही वाढते,हे खरे आहे.तसेच या संगीत ताजमहाल नाटकाबद्दल म्हणता येईल. डाॅ.विद्याधर ओक यांनी अभ्यासपूर्वक लिहलेल्या या नाट्यकृतीतून इतिहासातील एक पान उलघडलं गेलं आहे ते म्हणजेच ताजमहाल या सुंदर वास्तुकलाकृतीची निर्मिती होय.
ताजमहाल ही सुंदर वास्तू जगातील आश्चर्या पैकी एक मानली जाते. पण याच्या निर्माती मागे काय इतिहास घडला आहे हे नाटककार डाॅ.विद्याधर ओक यानी अभ्यासपुर्ण मांडलेला आहे.शेहनशहा शाहजहान यांचे आपली पत्नी मुमताज हिच्यावर जिवापाड प्रेम असते,तिचा मृत्यू चौदाव्या बाळंतपणानंतर लगेचच होतो तो दक्षिणेतील बु-हाणपूर या गावी, तेथेच तिचे दफन केले जाते परंतु शाहजहान हा आपल्या कांही दिवसाच्या बाळाला म्हणजेच गौहरला घेऊन तो दिल्लीला कुच करतो.परंतु मुमताजच्या मृत्यूने तो अतिशय दुःखी झालेल्या शाहजहानला सुचविण्यात येते की मुमताजची कबर आग्रा येथे आपल्या सानिध्यातच सुंदर वास्तूच्या रूपाने स्थापित करावी.मग सुरू होतो जागेचा शोध आणि यमुनेकाठीचे शिवमंदिराची जागा देण्यासाठी ते आपला मांडलीक राजा जयसिंग याच्या समोर प्रस्ताव ठेवतात आणि नाटकातील संघर्ष चालू होतो.राज जयसिंग शेवटी विचार करून हजारो माणसांची कत्तल टाळण्यासाठी होकार देतो आणि ताजमहाल या कलावास्तूच्या बांघकामला प्रारंभ होतो.
२० वर्षे लागतात ताजमहाल पूर्ण व्हायला .मध्यंतरी यामागे घडलेली चरणसिंगचा एकुलता एक पुत्र भवानी अाणि शहाजहानची बेटी गौहर यांचीखरी प्रेम कहानी नाटकातील अत्यंत हळुवार मांडणीने हे नाट्य रसिकांना भावते.भाषा,गीते,प्रसंग आणि व्यक्तिरेखांचे सुंदर मिश्रणामुळे नाटकात प्रेक्षक रममाण होतात अर्थातच हे श्रेय लेखकाचे आहे.नाटककार, गीत लेखक आणि संगीत दिग्दर्शक असा त्रिवेणी संगम १८८२साली सौभद्र या नाटकांचे नाटककार आण्णासाहेब किर्लोस्करांनी केला होता.तो परत १३८वर्षानी पहायला मिळाला आणि तोही डाॅ.विद्याधर ओक यांच्या ताजमहाल या नाटकातून.अप्रतिम असाच!मनोहर जोशी यांचे दिग्दर्शन चांगलेच होते.या नाटकाचा लिखाणा नंतर हा पहिलाच प्रयोग अत्यंत देखणा झाला यात वादच नाही. याचे श्रेय खल्वायनच्या सर्व टीमचे आहे.
शाहजहान,भवानी,गौहर, औरंगजेब, चरणजीतसिंग, आसफखान, जहाँआरा,जयसिंग, लालखान आणि इतर सर्वच कलाकारांनी आपल्या भूमिका उत्तम साकारल्या आहेत. यातील शाहजहान यांनी संयमाने केलेला अभिनय लक्षात राहतो.नाटकातील पदे सुंदर आणि सोपी रसिकांना भावनारीच आहेत आणि त्यांचे संगीतही तेवढेच चांगले जमले आहे.गायक कलाकारांचे गायन प्रभावी होते.सुंदर नेपथ्य, पार्श्वसंगीत,रंगभूषा, वेशभूषा यथोचितच होती. गायनाची भुरळ रसिकांना पडल्याचे त्यांच्या प्रतिसादावरूनच जाणवत होते.एकंदरीत ताजमहाल हे मराठी संगीत नाट्य अप्रतिम होते.









