उदयोन्मुख कलाकार शंतनु हेर्लेकर यांचे मत
प्रतिनिधी / बेळगाव
संगीत क्षेत्रात सतत शिकत राहणे आणि नियमीत रियाज करणे महत्वाचे आहे. आजच्या आधुनिक संगीताच्या जमान्यात कलाकाराला, तांत्रिक गोष्टी आत्मसात करण्याची सुध्दा गरज आहे, असे मत बेळगावातील उदयोन्मुख कलाकार शंतनु हेर्लेकर यांनी व्यक्त केले.
मंथन आयोजित ‘नव्या वाटा नवी क्षितिजे’ या सदरामध्ये वैभव लोकुर यांनी त्यांच्याशी संवाद साधला. ते म्हणाले, बेळगावमध्ये शिक्षण घेताना आपल्या कलेसाठी कष्ट घेणारे पालक व फक्त तबला शिकण्यासाठी मुंबईला जाणारा भाऊ यांना पाहत होतो. त्यामुळे प्रेरणा मिळाली व मी मुंबईला आलो. मुंबईच्या संपूर्ण वातावरणाशी जुळवून घेताना त्रास झाला. परंतु संगीताच्या अभ्यासाच्या नवीन संधी येथे मिळत गेल्या. येथे दररोज आपण काही शिकू शकतो, हे लक्षात आले आणि मी येथे रमलो, असे ते म्हणाले.
संगीत व्यवसायातील अर्थकारणाबद्दल बोलताना या क्षेत्रात पैसे अडकून पडतात. कसे येथील कधी येतील सांगता येत नाही. संगीत संयोजक ही एक कला आहे. मात्र कलाकाराला शांत बसून काम करणे अधिक आवडते. संगीत नियोजन करताना स्वतःला सतत सिध्द करावे लागते. आजच्या स्पर्धेच्या युगात ताण येवू शकतो. नकार पचवावे लागतात. त्यासाठी सक्षम असणे आवश्यक आहे, असेही ते म्हणाले.
या क्षेत्रात संधी आहे. पण असुरक्षितता आहे. पण वादक आणि तंत्रज्ञ म्हणून आपण अनुभवाने समृध्द होत असतो, हे कालाकाराने लक्षात घ्यायला हवे. आपल्या घरात शास्त्राrय संगीताची बैठक आहे. वडिलांनी कोणतीही सक्ती न करता आमच्यावर न कळत संस्कार केले. समुह गीतामध्ये प्रत्येकजण वेगवेगळय़ा सुरावटीवर गातो, ही संकल्पना समजली. गाण्याव्यक्तीरिक्त इतर काय काय घडते याचाही अंदाज आला आणि कलाकार म्हणून घडण्यासाठी त्याचा उपयोग झाला, असे त्यांनी सांगितले.
प्रारंभी मंजुश्री खोत यांनी ईशस्तवन सादर केले. प्रिया कवठेकर यांनी प्रास्ताविक केले. मनीषा नाडगौडा यांनी सुत्रसंचालन केले. राजश्री हलकर्णी यांनी परिचय करुन दिला. तंत्रसहाय्य वैभव लोकूर व नीना जठार यांचे होते. या कार्यक्रमाला राज्य मराठी विकास संस्था महाराष्ट्र संस्थेचे सहाय्य लाभले.